Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं
महाड साधारणतः उष्ण व दमट हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकण पट्टयात यंदा हिवाळ्याने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात सकाळी व रात्री गारठा, थंड वारे, काही भागांत धुके आणि तापमानात लक्षणीय घट जाणवत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची थंडी अधिक तीव्र असल्याने नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे. हवामानशास्त्रीय दृष्टीने यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. भूगोल व पर्यावरण विषयाचे अभ्यासक तसेच सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोलादपूर (जि. रायगड) येथील विभागप्रमुख प्रा. डॉ. समीर अरुण बुटाला यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर नैऋत्य मोसमी वा-यांची माधार सुरू होते. त्यानंतर उत्तर भारतात तापमान घटल्याने तेथे थंड हवेचा दाब वाढतो, हिमालयीन भागातून ही थंड व कोरडी हवा दक्षिणेकडे वाहू लागते. हेच ईशान्य मोसमी वारे महाराष्ट्र आणि कोकणात पोहोचल्यावर तापमान झपाट्याने खाली येते. ओलावा कमी आणि थंडपणा अधिक असल्याने रात्री व पहाटे गारवा प्रकर्षाने जाणवत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यावर्षी मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाची सुरुवात झाली आणि ऑक्टोबरपर्यंत अनेक भागांत पावसाची सक्रियता राहिली. परिणामी जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा साठला. ढगाळ हवामानामुळे उष्णता साठली नाही. ओलसर जमीन रात्री लवकर थंड होत असल्याने थंडी अधिक जाणवू लागली आहे.
कोकणाचे हवामान साधारणतः उष्ण व दमट असते. मात्र यंदा सातत्याने वाहणारे थंड वारे, अनेक दिवस स्वच्छ आकाश असल्याने रात्रीची उष्णता थेट अवकाशात निघून जाणे, तसेच जंगलतोड, डोंगर उत्खनन यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक उष्णता संतुलन बिघडणे, या कारणांमुळे कोकणातही थंडी तीव्रतेने जाणवत आहे.
प्रशांत महासागरातील एल-निनों व ला निना या हवामान प्रवाहाचा भारताच्या हिवाळ्यावर परिणाम होतो. एल-निनोच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होऊन उष्णता वाढते, तर ला-निना स्थितीत समुद्राचे पाणी थंड होत असल्याने वातावरणात गारवा वाढतो. यंदा ला-निनाचा पूर्ण प्रभाव नसला तरी अंशतः परिणाम जाणवत असून त्यामुळे उत्तरेकडील थंड चाऱ्यांना अधिक बळ मिळाले आहे.
Shivsena : “आम्ही फोटो आणि पीपीटी दाखवत नाही, काम करून दाखवतो…”, शायना एन.सी. यांचा उबाठावर हल्लाबोल
हवामान तज्ज्ञांच्या मते, ज्या वर्षी हिवाळा अधिक तीव्र असतो त्या वर्षी उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. जमिनीतील ओलाचा उन्हाळ्यात लवकर वाफ होतो आणि हवामानातील असमतोलामुळे उष्णतेच्या लाटा (हीट वेव्ह) निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे येणारा उन्हाळा अधिक उष्ण, कोरडा आणि त्रासदायक ठरू शकतो.
गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, समुद्रातील प्रवाहांतील बदल, वायुप्रदूषण आणि जंगलतोड यांमुळे हवामान अधिक अस्थिर झाले आहे. यंदा थंड हवेचा प्रवाह अधिक काळ टिकून राहिला, पावसाचा कालावधी लांबला.
सध्या कोकणात जाणवणारी थंडी ही केवळ ऋतू बदलाचा परिणाम नसून जागतिक हवामान बदल, समुद्रातील प्रवाहातील चढ-उतार, पावसाच्या स्वरूपातील बदल, वाऱ्यांची दिशा आणि मानवी हस्तक्षेप यांचा एकत्रित परिणाम आहे. भविष्यात अशा टोकाच्या हवामान बदलांना अधिक वेळा सामोरे जावे लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.- प्रा. डॉ. समीर अरुण बुटाला, भूगोल व पर्यावरण अभ्यासक, महाड






