Saswad News: सासवड-वाघापूर रस्त्यावर मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढेंच्या धसक्याने बेकायदेशीर कृत्य?
अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने मागील आठवड्यात पुरंदर तालुक्यात सोनोरी आणि बोपगाव मध्ये मोठ्या कारवाया केल्या होत्या. यामध्ये लाखो रुपयांचे सडके आंबे आणि मुदत संपलेला साठाही नष्ट करून व्यवसायाचे परवाने रद्द केले होते. त्यानंतर काही दिवसातच सासवड पोलिसांनी बोपगावमध्ये पुन्हा एकदा छापा टाकून तब्बल २२ लाखांचा गुटखा जप्त करून बेकायदेशीर धंदेवाल्यांना मोठा दणका दिला होता.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची पुरंदर तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली असून बेकायदेशीर धंदे करणारांचे धाबे चांगले दणाणले आहेत. काही दिवसापर्यंत पुणे जिल्ह्यासह विविध भागात प्रसिद्ध असणारा सासवडचा मावा पान टपरीत मिळेनासा झाला आहे. विमल आणि वेगवेगळा गुटखा विकणाऱ्या लोकांनी जागा मिळेल तिथे टाकून नष्ट केला आहे. काहींनी बाहेर बोभाटा होईल म्हणून घरातच जळून नष्ट केला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या औषधांकडे लक्ष केंद्रित केले असून औषधांची कडक तपासणी सुरु केली आहे. याचा धसका घेत एका व्यक्तीने मुदत संपलेली लाखो रुपयांची औषधे रस्त्यालगत टाकून दिलेली नुकतीच आढळून आली आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड वाघापूर रस्त्यावर पारगाव खिंडीत एका झुडपात सदर औषधांचा साठा आढळून आल आहे. या मध्ये चेहऱ्याला लावायच्या शेकडो स्क्रीमच्या डब्या आणि बाटल्या, वेगवेगळी औषधे, टेबलेटची पाकिटे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या औषधांचा साठा आढळून आला आहे.
Mumbai High Court: भाजप सरकार मुर्दाबाद म्हटल्याने कोणी तडीपार होत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा
सध्या पावसाळ्याचे दिवस असून सदर औषधे भिजल्यानंतर त्याचे प्रदूषण होणार आहे. रस्त्याने येणारे जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार आहे. तसेच जनावरांनी खाल्यास त्यानाही त्याचा त्रास होणार आहे. अशी परिस्थिती असताना बेकायदेशीरपणे एवढ्या प्रचंड प्रमाणात औषधे कोणी टाकली आहेत ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ज्या ठिकाणी मुदतबाह्य औषधे बेकायदेशीरपणे टाकून दिली आहेत. त्या ठिकाणापासून जवळच पुरंदर तालुका ग्राहक कल्याण फौंडेशनचे अध्यक्ष रामदास मेमाणे यांचे निवासस्थान असून त्यांनी या घटनेचा जोरदार निषेध केला आहे. नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी खेळण्याचा कोण प्रयत्न करीत आहे ? असा प्रश्न उपस्थित करून संबंधित व्यक्तीचा शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रामदास मेमाणे यांनी केली आहे.






