Breaking: गुजरात ATSची मोठी कारवाई: गुजरात आणि मध्य प्रदेशातून जैशचे ८ संशयित दहशतवादी अटक
Gujarat ATS Arrests 8 Terrorists: गुजरात एटीएसला एका कारवाईत मोठे यश मिळाले आहे. बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) शी संबंधित आठ संशयितांना गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून अटक करण्यात आली. ते गुजरातमध्ये आपल्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्यासाठी जैश-ए-मोहम्मदचे एक सक्रिय नेटवर्क स्थापित करण्याचे काम करत होते. गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, सर्व आठ आरोपींविरुद्ध यूएपीएच्या कलम १३, १७, १८, ३८, ३९ आणि सीआरपीसीच्या कलम १४८, ६१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अहमद अब्दुल्ला गाझीवाला, इब्राहिम मोहम्मद हुसेन घाघा, मुदस्सिर अब्दुल्ला गाझीवाला, झकारिया दुर्रानी, मुफ्ती फौजान, मोहम्मद अमीन शेरा, मोहम्मद अब्दुल रहमान सौदा आणि बिलाल मोहम्मद यांचा समावेश आहे.
गुजरात एटीएसने देशविरोधी कट रचल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. एटीएसच्या माहितीनुसार, हे आरोपी सोशल मीडियाद्वारे कट्टरपंथी विचारसरणीने प्रेरित होते आणि देशात ‘गझवा-ए-हिंद’ स्थापन करण्याचा कट रचत होते. एएनआयच्या वृत्तानुसार, दोन्ही आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुजरात एटीएसने अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती दिली आहे. दोन दहशतवाद्यांना गुजरातमधून, एकाला दिल्लीतून आणि एकाला नोएडा येथून अटक करण्यात आली. हे चौघे बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सामील होते आणि लोकांना दहशतवादी संघटनांशी जोडत होते. ते असे ॲप्स वापरत होते जे आपोआप मजकूर (कंटेंट) डिलीट करतात.
एक दिवसापूर्वी, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने चालणाऱ्या एका दहशतवादी आणि शस्त्रास्त्र नेटवर्कचा पर्दाफाश करून चार संशयितांना अटक केली. यात तीन संशयितांना पंजाबमधून आणि एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. आरोपींना त्यांच्या हँडलर्सनी दिल्लीतील धार्मिक स्थळे आणि पोलीस आस्थापनांची रेकी करण्याचे काम सोपवले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक केलेल्या संशयितांची ओळख शुभदीप सिंग उर्फ विशाल (२३), गुरजंत सिंग उर्फ ऋषी (२२), साजन सिंग उर्फ हनी (२८) आणि गगनप्रीत (२४) अशी पटली आहे. पोलिसांनी सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा एजंट शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांच्या सांगण्यावरून आरोपी दिल्लीत दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होते.






