सातारा जिल्हा खऱ्याअर्थाने भाजपचा बालेकिल्ला करणार
कराड : यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी राजकारण करण्याची सातारा जिल्ह्यात परंपरा आहे. त्यानुसार, सुसंस्कृत राजकारण करत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे भाजप एक नंबरचा पक्ष करणार आहेच. पण जिल्ह्यात भाजपच्या विचारांचा मतदार तयार करण्याचे काम भविष्यात करायचे असून, जिल्हा खऱ्या अर्थाने भाजपचा बालेकिल्ला करु, असा निर्धार आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
डॉ. भोसले यांची नुकतीच भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांचे शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी कराड येथे त्यांनी दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, सुहास जगताप, पै. धनाजी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आमदार भोसले म्हणाले, ‘लोकसभा व विधानसभेला यश मिळाले म्हणजे जिल्ह्यात पक्षाचा मतदार तयार झाला असे नाही. आगामी सर्व निवडणुका तर जिंकायच्या आहेतच. परंतु, कसल्याही परिस्थितीत पक्षाचे मतदार वाढवण्याचे काम करायचे आहे. यासाठी जुन्या नेत्यांप्रमाणे नीतीमूल्ये जपणारे राजकारण करत केंद्र व राज्य सरकारच्या योजना, विविध विकासकामे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून आपण करणार आहे’.
सत्तेच्या माध्यमातून लोकांना मदत करणार
आमदार भोसले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय महायुतीच्या पक्षातील तिन्ही नेत्यांनी घेतला आहे. एखाद्या ठिकाणी महायुती म्हणून लढत झाली नाही, तर तिथे स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून योग्य निर्णय घेतला जाईल. तरीही भाजप सर्वांना बरोबर घेऊन महायुती सरकारला पोषक अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून सत्तेच्या माध्यमातून लोकांना मदत करणार आहोत.
राजकारणाचे जोडे सहकाराच्या मंदिराबाहेर काढावेत
बाजार समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होतात. त्यासाठी राज्यस्तरावरील पक्षाचे धोरण अवलंबावे लागते. मात्र, सहकारी संस्थांच्या निवडणुका या सभासदांवर अवलंबून असतात. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, जयवंतराव मोहिते यांनी राजकारणाचे जोडे सहकाराच्या मंदिराबाहेर काढावे, असे सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकाराच्या निवडणुका या पूर्णपणे वेगळ्या असून, त्या-त्या निकषांद्वारे त्या लढवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.