QR कोड स्कॅन करा अन् दाखला मिळवा; नागरिकांच्या चकरा आता होणार बंद
चंद्रपूर : तालुक्यातील नागरिकांना शासकीय कार्यालयाला असणाऱ्या सुट्या व वेळेवर अधिकारी-कर्मचारी उपस्थित न राहणे यामुळे कार्यालयात आल्यानंतर दाखल्यांसाठी चकरा माराव्या लागतात. तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हेलपाटे व अडचणी कमी करण्यासाठी दाखला मिळेल, अशी व्यवस्था पोंभूर्णा तहसीलदारांनी महसूल सप्ताहाचे औचित्य साधून केली आहे.
दाखले क्यूआर कोड उपक्रमाची ही विशेष सुविधा मंगळवारी (दि.५) नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत नागरिकांना आता कार्यालयीन वेळेनंतर व सुटीच्या दिवशी किंवा आपत्कालीन परिस्थितीतही आवश्यक दाखले क्यूआर कोडच्या माध्यमातून मागवता येणार आहेत. यामुळे वेळ, प्रवास आणि अनावश्यक त्रास वाचून, आवश्यक सेवा डिजीटल स्वरूपात आणि पारदर्शक पद्धतीने प्राप्त होणार आहेत.
दाखले क्यूआर कोड उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शेलवटकर, सामाजिक कार्यकर्ते जगन येलके, वनपरिक्षेत्राधिकारी फणिंद्र गादेवार, नायब तहसीलदार रामकृष्ण उईके, मंडळ अधिकारी दीनकर शेडमाके यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, सध्या महसूल सप्ताह सुरू आहे. नागरिकांना सुलभता होईल, असे उपक्रम तहसील कार्यालयामार्फत राबविले जात आहेत. पोंभूर्णाचे तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांनी दाखले क्यूआर कोड उपक्रम ही विशेष सुविधा सुरू केली आहे.
नागरिकांना सुलभ सेवा देण्याचा प्रयत्न
नैसर्गिक आपती, सलग सुट्या अशा प्रसंगी कोणतेही नुकसान होऊ नये हा तहसील कार्यालयाचा हेतू आहे. हा उपक्रम पोंभूर्णा तालुक्यातील नागरिकांना महसूल सेवा अधिक सुलभ, वेळेत आणि डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वास तहसीलदार शेलवटकर यांनी व्यक्त केला आहे.
शासनाच्या सर्व सेवेच्या माहितीसाठी क्यूआर स्कॅन करा
आपले व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर वरील बाजूस तीन टिंब दिसतात, त्यावर दाब दिल्यास मेनू आपन होईल. त्यानंतर सर्वात खाली सेटिंगमध्ये जावे. वर उजव्या बाजूस क्यूआर कोड चिन्ह दिसते. त्यावर क्लिक करा. स्कॅन कोड वर क्लिक करा व वरील फ्लेक्सवरील तहसील कार्यालय पोंभूर्णा क्यूआर कोड स्कॅन करा. त्यावर आपले प्रमाणपत्र / दाखला पावती पाठवावी. सर्व शासनाच्या सेवेच्या माहितीसाठी या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२२४७५७४३ चा वापर करावा.