छगन भुजबळ यांनी स्पष्टचं सांगितलं (फोटो सौजन्य-X)
Chhagan Bhujbal News In Marathi: महाराष्ट्रातील नव्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्याला राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर दिल्याचा दावा केला होता, मात्र त्यांनी तो फेटाळून लावला. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील आमदार भुजबळ यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांना सांगितले की, त्यांनी राज्यसभेच्या जागेची ऑफर नाकारली कारण हा त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा विश्वासघात आहे, जिथून ते गेल्या महिन्यात झालेल्या राज्य निवडणुकीत विजयी झाले होते. तर आज (17 डिसेंबर)मंत्रिपद न मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भुजबळांनी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे. सगळ्यांनी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. ‘मी मंत्रीमंडळात असावं,’ असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरला होता, पण तरीही मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. मंत्रिपद कुणी नाकारलं, हे शोधावं लागेल, असे सांगत भुजबळांचा रोख कुणाकडे आहे, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न विचारण्यात येत आहे. तीनही गटांचे नेते निर्णय घेत असतात. आमच्या गटाचे नेते अजित पवार त्यांचा निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पण माझी अवहेलना केली गेली त्याचं दुःख आहे. उद्या यावर आणखी काही बोलणार आहे.”
तसेच भुजबळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, “चर्चा करू म्हणून बसलो, पण चर्चेला कोणी बसलंच नाही. बस बस उठ उठ असं सांगायला मी तसा नाही. मी आता माझ्या समर्थकांची भूमिका समजून घेत आहे. माझ्या मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतली होती. पण त्यानंतरही मला मंत्रिपद का मिळालं नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.”
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलले नसल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांना विरोध केल्यामुळेच त्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आल्याचा दावा ओबीसी (इतर मागासवर्गीय) नेते भुजबळ यांनी केला. ‘जेव्हा मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करत होते, तेव्हा मी इतर मागासवर्गीय समाजाच्या बाजूने आवाज उठवला होता. लाडकी बहिन योजना आणि ओबीसींनी महायुतीला निवडणुकीत विजय मिळवून दिला.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप (भारतीय जनता पक्ष), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या मित्रपक्षांच्या एकूण 39 आमदारांनी रविवारी शपथ घेतली. 10 माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून 16 नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मंत्री भुजबळ आणि राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि विजयकुमार गावित या प्रमुख नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश नाही.