संग्रहित फोटो
पुणे : वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्तता करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, विविध उपाययोजनांसोबतच आता अंतर्गत देखील बदल सुरू केले आहेत. त्यानूसार, पहिले पाऊल टाकत वाहतूक विभागात खांदेपालट केले असून, शहरातील सर्व ३१ वाहतूक विभागाच्या प्रमुखांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या ठिकाणी त्यांना नेमणूक दिली असून, सुरळीत वाहतूकीच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कोथरूड, शिवाजीनगर, स्वारगेट, हडपसर, बाणेर, नगर रोड, कात्रज आदी प्रमुख मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर सक्रिय असतात.
तथापि, काही वेळा अपघात किंवा वाहतूक कोंडीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत वरिष्ठ अधिकार्यांना घटनास्थळी त्वरीत पोहचणे आवश्यक असते. याच पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस निरीक्षकांची नेमणूक त्यांच्या राहत्या ठिकाणाच्या जवळच्या विभागात करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे पोलीस निरीक्षकांना अपघात अथवा इतर तातडीच्या घटनांमध्ये लवकर प्रतिसाद देता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत होईल तसेच नागरिकांची गैरसोय टळेल, असा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यानूसार वाहतूक शाखेतील तब्बल ३१ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या आधिकार्यांना तात्काळ नव्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात सतर्क राहण्याच्या सूचना
पुणे शहरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न आहे. त्यात पावसाळ्यामध्ये यात भर पडते. प्रमुख रस्त्यांवर पाणी साचणे, कोंडी यासांरख्या समस्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या कालावधीत सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्तांनी केलेल्या आहेत. त्याअनुषंगाने वाहतूक पोलिस, प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.