दहा रुपयासाठी नातवाने केला आजीचा निर्घृण खून (संग्रहित फोटो)
महागाव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आठवडाभरापूर्वी माळकिन्ही येथे मनोरुग्ण लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला होता. त्यानंतर आता मनोरुग्ण नातवाने फक्त 10 रुपयांसाठी आजीचा निर्घृण खून केला. ही घटना तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी) येथे बुधवारी सकाळी घडली.
कोंडाबाई बालचंद्र जाधव (वय ८५, रा. सुधाकरनगर, तांडा) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. तर श्याम उत्तम जाधव (वय २६, रा. सुधाकरनगर तांडा) असे तिच्या मारेकरी नातवाचे नाव आहे. वार्धक्याने कोंडाबाई ही नेहमीच आजारी राहायची. गेल्या काही दिवसांपासून तर ती अंथरूणाला खिळली होती. सकाळी नेहमीप्रमाणे ती आराम करत असताना आरोपी नातू तिच्याकडे आला.
तसेच खर्चासाठी दहा रूपयांची मागणी केली. तेव्हा तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या नातवाने तिच्यावर लाकडी काठीने हल्ला चढविला. त्यामध्ये तिच्या तोंडाला आणि छातीला गंभीर दुखापत होऊन ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
दरम्यान, ही बाब शेजारी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ तिला सवना येथील ग्रामीण रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी यावेळी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. शिवाय घटनास्थळ गाठून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले.
नातेवाईकांच्या जीविताला धोका
महागाव तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मनोरुग्णांची संख्या वाढतीच आहे. क्षुल्लक कारणावरून त्यांच्याकडून हिस्त्र होत गुन्हेगारी घटना घडत आहे. नागरिकांच्या नव्हेतर नातेवाईकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने मनोरुग्णांचे गावपातळीवर सर्वेक्षण करून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे.