मुंबई – भाजपाचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विनयभंगप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. “जितेंद्र आव्हाडांनी थिएटरमध्ये पत्नीसमोर एका व्यक्तीला जनावरासारखं मारलं, कपडे फाडले,” असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. तसेच आव्हाडांचं प्रकरणा सुर्यप्रकाशाएवढं स्वच्छ आहे, असंही म्हटलं. ते मंगळवारी (१५ नोव्हेंबर) नंदूरबारमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांच प्रकरण सुर्यप्रकाशाएवढं स्वच्छ आहे. परवा त्यांनी एका थिएटरमध्ये पती-पत्नी सिनेमा बघायला गेले असताना पत्नीसमोर पतीला जनावरासारखं मारलं आणि अंगावरचे कपडे फाडले. त्यांना हा अधिकार कोणी दिला आहे.”
“गेल्यावेळी एका व्यक्तीने आव्हाडांविरोधात सोशल मीडियावर काहीतरी लिहिलं, तर त्यांनी त्याला घरात बंद करून, कपडे काढून बेदम मारहाण केली आणि अंगावर चामडे ठेवले नाही. आव्हाडांनी आधीच्या लोकांना केलेली मारहाण काय आहे? त्यांना हा अधिकार कोणी दिला?” असा प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला.