'या' गावांच्या भूमिअभिलेख कार्यालयातील नोंदींमध्ये गंभीर तफावत, माजी आमदारांची बैठकीची मागणी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील मौजे सापाड, उंबर्डे, गंधारे, गौरीपाडा तसेच इतर गावांच्या भूमिअभिलेख कार्यालयातील नोंदींमध्ये गंभीर तफावत दिसून आली. याचसंदर्भात तातडीने बैठक बोलविण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून या विषयाची सविस्तर माहिती देत बैठक घेण्याची मागणी केली आहे.
माजी आमदार पवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, संबंधित गावांमधील मूळ सर्वे नंबरच्या नोंदी सिटी सर्वे नंबरप्रमाणे करण्यात आल्या आहेत. मात्र, या प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करता तसेच संबंधित शेतकरी आणि खातेदारांना कोणतीही नोटीस, सूचना किंवा सुनावणी न देता नोंदी करण्यात आल्या आहेत. परिणामी चौकशी नोंदवही, आलेख आणि नकाशांमध्ये अनेक ठिकाणी गंभीर चुका, विसंगती निर्माण झाल्याचे नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
या सदोष नोंदींमुळे शेतकरी आणि मूळ खातेदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, न्याय मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
तसेच या बैठकीतून सदोष नोंदींचा सखोल आढावा घेऊन योग्य दुरुस्तीच्या उपाययोजना केल्या गेल्यास अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि प्रशासनावरील विश्वासही दृढ होईल अशी भूमिकाही नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे. सदर विषयांमध्ये माननीय महसूल मंत्री यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला असून लवकरच सदर विषयात बैठक लावण्याचे आश्वासन माननीय महसूल मंत्री यांनी दिले आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील वाहतूक कोंडीने रस्ते जाम होत आहेत. या वाहतूक कोंडीने नागरीकांसह, प्रवासी, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजनाचा अभाव आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि मेट्रोचे सुरु असलेले काम ही वाहतूक कोंडी होण्यासाठी प्रमुख कारणे आहे. त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत या वाहतूक कोंडीतून सुटका होणे अशक्य आहे असचं म्हणावं लागेल. कल्याण डोंबिवलीतील नागरीकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.