दिवाळीचा फिव्हर कायम; चाकरमान्यांनी साधला पर्यटनाचा योग (Photo : iStock)
नाशिक : सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या आठ दिवसाच्या काळात शुक्रवार वगळता सलग लागून आलेल्या सुट्ट्यांची पर्वणी साधण्याची संधी मिळाल्याने कार्यालयांमध्ये कमालीचा शुकशुकाट जाणवत होता. दिवाळीचा फिवर कायम असून थेट सोमवारीच कार्यालये गजबजणार आहेत.
गेल्या शनिवारी (दि.१८) धनत्रयोदशीने दीपोत्सवास सुरूवात झाली. सोमवारी नरक चतुदशी मंगळवारी लक्ष्मीपूजन, बुधवारी बलिप्रतिपदा, गुरुवारी भाऊबीज अशा सलग सरकारी सुट्टया होत्या. शुक्रवारी (दि.२४) सुट्टी नसली तरी शनिवारी आणि रविवारी मात्र हक्काची साप्ताहिक सुट्टी होती. या सलग जोडून आलेल्या सुट्ट्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्वणीच ठरल्या.
शुक्रवारची रजा टाकून संपूर्ण आठवडाभर सुट्टया घेण्याकडे बऱ्याच कर्मचाऱ्यांचा कल दिसून आला. दरम्यान, बहुतेक कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांमध्ये गावी जाऊन दिवाळी साजरी करत आनंद द्विगुणित केला. तर काहींनी कुटुंबासोबत पर्यटन केले. काही कर्मचाऱ्यांनी तिर्थस्थळांना भेटी देण्याचाही बेत आधीच आखून ठेवला होता.
सलग सुट्ट्या कर्मचाऱ्यांसाठी ठरल्या पर्वणी
सलग सुट्ट्या कर्मचाऱ्यांसाठी पर्वणीच ठरल्या असल्या तरी शुक्रवारी सर्वच सरकारी कार्यालय मात्र ओस पडल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते. बांधकाम, सामान्य प्रशासन यासारख्या विभागांमध्ये हे चित्र
बँकांचे कामकाज मात्र नियमितपणे सुरू
अन्य सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना बँक कर्मचारी मात्र इमानेइतबारे सेवा बजावित होते. एक-दोन दिवस बँकांना दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. त्यामुळे बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू होते.
ऑनलाईनमुळे एटीएमचा भार हलका
मोठ्या प्रमाणात मोबाईलवरून ऑनलाईन पध्दतीनेच आर्थिक व्यवहार केले जात आहे. त्यामुळे बँक तर सोडाच पण, एटीएमवरही जाण्याची गरज राहिलेली नाही. ऑनलाईन पध्दत सुरू होण्यापूर्वी सुट्टीच्या काळात पैसे काढण्यासाठी एटीएमच आधार असल्याने नागरिकांच्या लांबच रांगा लागलेल्या असायच्या.
या मशीनमध्ये असलेली रक्कम संपल्यानंतर नागरिकांना ऐन सणासुदीत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे. यावेळी मात्र सलग आठ दिवस सुट्टया असल्या तरी असे चित्र शहरात कुठेही दिसून आले नाही. ऑनलाईनमुळे एटीएमचा भार हलका झाल्याचे दिसून आले.






