मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई: राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात आढावा बैठक घेतली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या 9 सेवा एकत्र करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे.
सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल, या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश असावा व गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सेवा वितरणात अपीलची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि प्रमाणपत्र वितरणासाठी मल्टी-मॉडेल प्रणाली (जसे की ईमेल, पोर्टल, व्हॉट्सअॅप) वापरण्याच्या सूचना दिल्या. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचे काम सुरू असून त्या पैकी ९९७ सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये २३६ सेवांची वाढ झाली आहे.
CM फडणवीसांचे निर्देश
जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. यंत्रणांनी योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही, याबाबत यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Devendra Fadnavis: “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…”; CM फडणवीसांचे निर्देश
अमृत २.० अभियानाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरी भागात पाणीपुरवठा, मलनिःसारण, हरित उद्याने व सरोवर पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अमृत अभियानांतर्गत निधी देण्यात येत आहे. नागरी भागात जनसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याची क्षमता या अभियानात आहे. त्यामुळे यंत्रणांनी मिशन मोडवर या अभियानांतर्गत प्रलंबित असलेली सर्व कामे ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण करावीत. अभियानांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात. तसेच नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेंकडून त्यांचा सहभाग उपलब्ध करुन द्यावा.