संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यासह देशभरात दररोज खून, मारामाऱ्या, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वडगाव मावळ तसेच सातारा, रायगड जिल्ह्यातील कुख्यात गुंड किरण मोहिते याच्यासह साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हे आदेश दिले आहेत.
किरण एकनाथ मोहिते (वय २९, रा. व्हिजन वुडस, जांभुळ ता. मावळ), एकनाथ अर्जुन मोहिते (वय ५३ रा. जांभुळ ता. मावळ) रविंद्र लक्ष्मण मोहिते (वय ३३ रा. कुडेवाडा, वडगाव मावळ), मयुर ऊर्फ चण्या बजरंग मोढवे (वय २६, रा. ढोरेवाडा, वडगाव मावळ ) करण रमेश पवार (वय २५, रा. टाकवे बुदुक, ता. मावळ ) सुशांत अनिल साबळे (वय २४, रा. केशवनगर, वडगाव मावळ) अशी मकोका कारवाई केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख किरण मोहिते पसार असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
मोहित टोळीने वडगाव मावळसह पुणे ग्रामीण, सातारा, रायगड जिल्हयामध्ये दहशत माजविली होती. मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, जबरी चोरी करणे, डॉक्टरांवर हल्ला करणे, कट करुन खंडणी मिळवण्यासाठी खुनाचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न करणे असे नऊ गुन्हे दाखल आहेत. वडगाव मावळ भागातील एका हॉटेलमध्ये १० नोव्हेंबर २०२४ रोजी मोहिते आणि साथीदारांनी संतोष रामभाऊ साळुंखे यांच्यावर हल्ला केला होता. याबाबत शाहरुख हनिफ अत्तार (वय ३२ रा. चिखली, पिंपरी-चिंचवड ) यांनी वडगाव मावळ पोलिसांत तक्रार दिली होती. गुन्ह्यात ७ आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. उपनिरीक्षक आर. आर. मोहिते यांनी सात आरोपींविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मोहितेसह टोळीविरूद्ध ‘मकोका’ करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनखाली तयार करण्यात आला.
टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
सासवड रस्त्यावर पूर्वी झालेल्या वादातून तरुणावर हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या डोक्यात गज घालून गंभीर जखमी केले आहे. वडकी नाला भागात ही घटना घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विकी सुरेश खोमणे (वय ३८, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती,) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ऋषिकेश हनुमंत चव्हाण, मयुर संजय चव्हाण, तेजस तानाजी खंडाळे, सुरज बाबजी खोमणे, अक्षय ऊर्फ गोटू छगन माकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खोमणे याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.