निकालानंतर काँग्रेसच्या छुप्या बैठका वाढल्या
महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. अनेक जागांवर अद्याप एकमत झालेले नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप कायम आहे. जागावाटपाचे सूत्र कायम झालेले नसतानाच महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी छुप्या बैठकांचा सिलसिला सुरु केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री पदाबरोबर मंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील सर्वच बडे नेते या बैठकींमध्ये सध्या व्यस्त असल्याचे माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. याशिवाय या बैठकींमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संवाद साधून त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींकडून सुरु असल्याचेही कबुली अनेक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
काँग्रेसची उमेदवारांची चाचपणी
महाविकास आघाडीला मुख्यत: काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण असून विधानसभेत जास्तीत जास्त पक्षाने लढव्यावात यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी जागावाटपाच्या चर्चेतही काँग्रेस जास्तीत जास्त जागांसाठी दावा करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांची चाचपणी पूर्ण करीत एक यादी जवळपास निश्चित केली आहे. लवकरच या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतला जाणार असून त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मानस बोलून दाखविला आहे.
बैठकांचा जोर
तर दुसरीकडे या इच्छुक उमेदवारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षांतंर्गत बैठकांचा जोर वाढल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या समर्थकांच्या बैठकांचे आयोजन करीत निवडणुक कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच अनेक प्रथम फळीतील नेते मंडळींकडून इच्छुक उमेदवारांची वैयक्तिक भेट सुद्धा घेतली जात आहे.
समित्यांची ऑफर
या भेटीत निवडणुकीसाठी तयारीला लागण्याची सूचना देतानाच निवडणुकीनंतरच्या रणनितीवरही चर्चा केली जात असल्याची माहिती काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने खासगीरित्या बोलताना दिली. या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री पदाबाबतही चर्चा करण्यात आल्याची कबुलीही यावेळी अनेकांकडून देण्यात आली आहे. याशिवाय अनेक नेते मंडळींकडून इच्छुकांना मंत्री पदासोबतच इतर महामंडळ किंवा समित्यांची ऑफर देत असल्याची माहिती यावेळी पुढे आली आहे. पक्षातील या छुप्या बैठकींची माहिती सध्या दिल्ली दरबारीही पोहचली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पक्षातील या अंतर्गत गटबाजीचे आव्हान आता महाराष्ट्र काँग्रेसमोर असणार आहे.
हेदेखील वाचा – ‘मी साहेबांना सांगूनच वेगळी राजकीय भूमिका घेतली’; अजित पवारांचा मोठा दावा