'अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका'; अजित पवारांचे मिरजेतील प्रचारसभेत विधान
सांगली : जातीचा, पातीचा, नात्याचा, विचार करून समाजाला पुढे नेता येत नाही. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करून, जाती-जातीमध्ये अंतर पाडून राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही, देश पुढे जाऊ शकत नाही, म्हणून शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने अल्पसंख्याकांना न्याय देण्याची आमची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंत्री मकरंद पाटील, आमदार इंद्रिस नायकवडी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे, किशोर जामदार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे; आम्ही केवळ त्यांचे विचार बोलण्यात नाही; तर कृतीतून देखील करून दाखवले आहेत. अल्पसंख्याक खात्याचा सध्या मी मंत्री आहे, यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, शीख समाजाला न्याय देण्यासाठी अर्थमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडेन. सारथी, बार्टी, महाज्योती सारख्या संस्थांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाला आम्ही न्याय देऊ, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
मुस्लिम समाजाला दिले नेतृत्व
ते म्हणाले, “विधिमंडळात वरिष्ठ सभागृहात मुस्लिम समाजाकडे कोणतेही नेतृत्व नव्हते. म्हणून आम्ही मुस्लिम समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने मिरजेचे इंद्रिस नायकवडी यांना विधान परिषदेवर संधी दिली. हे उपकार म्हणून नव्हे तर माझी जबाबदारी म्हणून मी ते काम केले आहे; कारण अल्पसंख्यांकांचे प्रश्न आग्रहाने विधिमंडळात मांडण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी तिथे असणे गरजेचे होते. मुश्ताक अंतुले यांना मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष पद देऊन संधी दिली. कोल्हापूरमधून गेल्या अनेक वर्षांपासून हसन मुश्रीफ यांना आमच्या पक्षाने संधी दिली आहे. मंत्रिपद ही दिले आहे, सना मलिक आमच्यासोबत आमदार म्हणून काम करत आहेत.”
मिशन हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न
मिशन हॉस्पिटलमध्ये सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि कर्नाटकातील गोरगरिबांना उपचार मिळत होते. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून बंद आहे, वैद्यकीय शिक्षण खाते आमच्या हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे, हे हॉस्पिटल सुरू करून गोरगरीब रुग्णांना उपचार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, वसंतदादा पाटील वैद्यकीय महाविद्यालय, सांगली येथील परिसरातील कामे व्हावीत, अशीही मागणी होती. त्यासाठी आम्ही १४ कोटी रुपयांचा निधी आम्ही मंजूर केला आहे. त्याच्यामध्ये काही नवीन उपकरणं आपल्याला घ्यावी लागतील. काही सुधारणा आपल्याला करावी लागतील, त्या आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व्हे करू आणि त्याचा उपयोग सांगली-मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांना होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम






