निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरेंची मागणी (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटप आणि बोलणी सुरु आहे. मात्र काही जागांवर आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोंगडं भिजत आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना निवडणूकीपूर्वी हा चेहरा समोर आलेला हवा आहे. तर निवडणूकीनंतर याचा विचार करावा असा शरद पवार यांचा सल्ला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे.
दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मात्र बंडाच्या राजकारणामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार योग्यरितीने कार्यरित झाल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांच्या देखील महत्त्वकांशा वाढल्या आहेत. कॉंग्रेसकडून देखील मुख्यमंत्रिपदाची मागणी होत आहे. यापूर्वी यावरुन जोरदार राजकारण रंगलेले असताना शरद पवार यांनी निवडणूकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल असा थेट निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे.
हे देखील वाचा : भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला…; काश्मीरच्या पराभवानंतर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चेहरा जाहीर करावा, माझा पाठींबा असेल असा असे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे म्हणाले आहे. तसेच आपलं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नसून पुन्हा येईन असं नाही, म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जात आहे. हरयाणा विधानसभेमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे ठाकरे गटाकडून दबावतंत्र वापरले जात असल्याची देखील चर्चा आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.