मिठीबाई कॉलेजमधूब शिक्षण पूर्ण करताना सतीश राजवाडे यांनी एकांकिका स्पर्धामधून सुरुवात केली. करियरच्या सुरुवातीला त्यांनी विनोदी आणि गंभीर अशा अनेक नाटकातून अभिनय साकारला. केदार शिंदे यांच्या ‘टुर टूर’ या नाटकात एका विनोदी गुजराती माणसाची भूमिका राजवाडेंनी साकारली पण त्यांना पाहिला ब्रेक मिळाला ते महेश मांजरेकारांच्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने. त्यानंतर कधी राजवाडेंनी मागे वळून पाहिलचं नाही.
राजवाडेंचा अभिनय कमाल आहेच पण नाटक करता करता त्यांना जाणवलं आपण एखादी गोष्ट खूप छान मांडू शकू. त्यांनंतर या अभिनेत्याचा प्रवास दिग्दर्शनाकडे सुरु झाला. 2001 मध्ये सतीश राजवाडे यांनी पहिला सिनेमा दिग्दर्शित केला तो म्हणजे ‘मृगजळ- एक नसलेलं अस्तित्व’. या त्यांच्या पहिल्याच सिनेमाने बरेच पुरस्कार पटकावले. सिनेमा यशस्वी झाला. मात्र त्यानंतर बरेच दिवस राजवाडेंकडे काही काम नव्हतं. ते दिवस खूप संघर्षाचे गेले. आशेचा किरण म्हणावा तसं पुन्हा एक संधी मिळाली आणि ती म्हणजे असंभव मालिका. झी मराठी साधारण 10 ते 14 वर्षांपूर्वी गाजलेली मालिका असंभवचं दिग्दर्शन केलं. या मालिकेशी राजवाडेंचा खूप जवळचा संबंध आहे. ही मालिका सुरु झाली तेव्हा प्रेक्षकांनी यावर टीका केली. अंधश्रद्धेला दुजोरा देणारी मालिका आहे अशी टीपणी झाली. त्यानंतर मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजवाडेंवर आली. जी मालिका काही ठारविक भागातच संपणार होती तिला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि याचे तब्बल 500 भाग पूर्ण झाले.
मृगजळ, गैर यांसारख्य़ा थ्रील सिनेमांमध्ये जसा राजवाडेंचा हातखंड आहे तसंच त्यांनी विनोदी आणि रोमॅन्टीक सिनेमांची पर्वणी देखील प्रेक्षकांनी दिली. बदाम राणी गुलाम चोर , एक डाव धोबी पछाड आणि पोपट या विनोदी सिनेमांप्रमाणेच त्यांनी प्रेक्षकांची प्रेम या अडीच शब्दाची गोष्ट देखील सांगितली. मुंबई पुणे मुंबई सिनेमा आजही प्रत्येक मराठी तरूणासाठी स्पेशल आहे. प्रेमाची गोष्ट आणि ती सध्या काय करते हे सिनेमे दिग्दर्शक म्हणून सतीश राजवाडे यांच्या करियरमधले मास्टरपीस म्हणायला हरकत नाही.
मराठी सिनेसृष्टीची एक सकारात्मक पैलू सांगायचा तर अभिनेता, दिग्दर्शक किंवा लेखक देखील सिनेमा जसा उत्तम करतो तसंच एकहाती नाटक आणि मालिका देखील उत्तमप्रकारे हाताळतात. सिनेमाचे दिग्दर्शन राजवाडेंनी जितक्या चांगल्या प्रकारे हाताळलं त्याचप्रकारे, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अग्नीहोत्र, गुंतता हृदय हे या मालिकांना देखील तितकीच लोकप्रियता मिळाली. सिनेमा आणि मालिकांमधून काम करताना राजवाडेंनी नाटकाशी असलेली नाळ देखील तितकीच भक्कम ठेवली. तब्बल 19 वर्षांनी अ परफेक्ट मर्डर या नाटकातून सतीश राडवाडेंनी पुन्हा रंगभूमीवर कमबॅक केलं. आज हा अष्टपैलू कलाकार स्टार प्रवाह वाहिनीचा प्रोग्रामिंग हेड आहे. या तरुण वर्गाच्या लाडक्या दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा….






