सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा (फोटो सौजन्य- pinterest)
सातारा : सातारा जिल्ह्यातील मोठ्या व लघु, मध्यम बंधारा प्रकल्पांमध्ये तब्बल 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तरीसुद्धा जिल्ह्याच्या पूर्व भागाला पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यामध्ये माण तालुक्यात 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तसेच पुढील 50 दिवसांचा आराखडा प्रशासनाने सक्रिय केला आहे.
शासकीय पाच आणि खाजगी 42 अशा 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, मान तालुक्यामध्ये 18 तर खटाव तालुक्यामध्ये 24 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. पाटण तालुक्यात एक गाव व चार वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर 1586 लोकसंख्या व नऊशे पशुधन अवलंबून आहे. वाई तालुक्यात एक गाव, तीन वाड्या कोरेगाव तालुक्यात 11 टँकरचा पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात भूजल पातळीत घट झाल्याने ग्रामीण भागात काही गावात दोन दिवसात पाणी तर काही गावात आठवड्यातून एकदा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
सातारा जिल्ह्यातील 28 विहिरी आणि 11 बोअरवेल अधिग्रहित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये 41% पाणीपुरवठा शिल्लक असला तरी आगामी उन्हाळ्याची तीव्रता आणि मान्सूनची स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी पाण्याची दिवसान आवर्तने सोडण्याचे निर्देश आहेत. जिल्हा प्रशासनाने तहसीलदार व प्रांत यांना विभागवार बैठका घेऊन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन निर्देशित केले आहे .
माण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागली होती. माण तालुक्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्यावर प्रशासनाने 42 गावे व 291 वाड्यांमध्ये टँकरचा पाणीपुरवठा सुरू केला आहे. या पाण्यावर 65152 लोकसंख्या आणि 40270 पशुधन अवलंबून आहे. खटाव तालुक्यामध्ये सध्या पाणी स्थिती समाधानकारक असली तरी आगामी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता गरजेनुसार 11 टँकरचा पाणीपुरवठा ‘स्टॅन्ड बाय मोड’वर उभा करण्यात आला आहे. त्यातील पाच टँकर सध्या सक्रिय आहेत.
हवामानशास्त्र विभागाकडून मान्सूनची सुखद वार्ता
यावर्षी हवामानशास्त्र विभागाने 103 टक्के मान्सूनची सुखद वार्ता दिली आहे. तरीसुद्धा सातारा जिल्ह्यात पाटणचा डोंगरी भाग तसेच सातारा तालुक्यातील विशेषता कास पठार परिसरातील गावे ही तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सातारा तालुक्यातील उरमोडीचे पात्र सध्या आवर्तन नसल्यामुळे कोरडे पडले असून, उरमोडीच्या काठावरील गावांना सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. या संदर्भात प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.