इंदापूर – लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या दोन दिवसांनी पार पडणार आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचार आणि सभांचा आज धुरळा उडला आहे. बारामतीमध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा भरलेल्या आहेत. इंदापूरमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांच्यावर कडक शब्दांत टीका करत शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला.
शरद पवार काय म्हणाले?
इंदापूरच्या सभेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले, “ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. देशाची सत्ता भाजपाकडे आहे. भाजपाकडे सत्ता आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे निर्णय घेतले, त्यामुळे समाजातील मोठा वर्ग आज अस्वस्थ आहे. त्यामुळे या संपूर्ण देशाचे राजकारण योग्य ट्रॅकवर कसे आणता येईल, याचा विचार आम्ही करत आहोत. वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांना आम्ही एकत्र आणले आहे. इंडिया आघाडी तयार केली. यानंतर देशातील परिस्थिती बदलायला लागली आहे. आज केरळ, तामिळनाडू, आध्र प्रदेशसह अनेक राज्यात भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसामध्ये भाजपाची सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे देशाचा कारभार योग्य पद्धतीने करायचा असेल तर भाजपाचा पराभव केल्याशिवाय पर्याय नाही”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
एवढंच सांगतो मामा जरा जपून
“इंदापूरमधील काही लोकांची आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुमच्या शेतातील पाणी बंद करू. शेतीचे पाणी हे कोणाच्या बापाची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगतो मामा जरा जपून. सरळ करायला वेळ लागणार नाही. तुझ्यासाठी काय केले नाही. दुकानात मदत पाहिजे, त्यामध्ये मदत केली. लहान कुटुंबातील लोकांना मदत करणे, पाठिंबा देणे याची गरज असते. ती भूमिका मी घेतली. मात्र, आज त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही. त्यांचे पाय हवेत आहेत. आज मी एवढे सांगतो की, कोणीही सत्तेचा गैरवापर करत दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवणे हे काम मी एक ते दोन दिवसांत करू शकतो. पण आज त्या रस्त्याने जायचे नाही”, अशा कडक शब्दांत शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना इशारा दिला आहे.