कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; 'शाहू आघाडी'कडून मिळाली उमेदवारी
कोल्हापूर / दीपक घाटगे : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी समाजातील शिवानी गजबर आणि सुहासिनी देवमाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवानी गजबर यांनी आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या ‘राजर्षी शाहू आघाडी’कडून प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी दाखल केली आहे. तर सुहासिनी देवमाने यांनी प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली.
आर्थिक कारणांमुळे प्रमुख पक्षांकडून उमेदवारी नाकारली गेल्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तृतीयपंथी उमेदवारांनी समाज व प्रभागातील प्रश्न सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘पुरोगामी विचारांची ओळख असलेली कोल्हापूरची जनता निश्चितच तृतीयपंथी उमेदवाराला निवडून देईल, अशी आशा शिवानी गजबर यांनी व्यक्त केली.
हेदेखील वाचा : Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येक प्रभागात तोडीस तोड, मातब्बर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडूनही आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच ८१ जागांवर सक्षम उमेदवार देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
कोल्हापूर शहरात तृतीयपंथी समाजाची लक्षणीय संख्या असून, यापूर्वी कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत जावेद पिंजारी या तृतीयपंथी उमेदवाराने निवडणूक लढवून सर्वांचे लक्ष वेधले होते. अटीतटीच्या त्या लढतीत त्यांनी ३५१ मते मिळवली होती. या निकालाची चर्चा त्या काळात कागलच्या राजकारणात रंगली होती.
उमेदवारी अर्ज दाखल
महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी एकत्र येत ‘राजर्षी शाहू आघाडी’ स्थापन केली आहे. या आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक २० मधून शिवानी गजबर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर सुहासिनी देवमाने यांनी प्रभाग क्रमांक १७ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
पैशांअभावी प्रमुख पक्षांनी उमेदवारी नाकारली
तृतीयपंथीनी महायुतीतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उबाठा) यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, आर्थिक सक्षमतेचा मुद्दा पुढे करत तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे आता निवडणूक मैदानात उतरून तृतीयपंथी समाजासह प्रभागातील प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा आणि जनतेच्या पाठबळावर ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.






