मुंबई – लोकसभा निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये राजकीय वादंग निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगितला असून प्रत्यक्षपणे अजित पवार गटाला लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा खोचक शब्दांत उल्लेख करण्यात आला आहे.
शरद पवार गटाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी व्हिडिओ शेअर करण्यात आलेली आहे. सकाळी पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन मांडलिकत्व पत्करणाऱ्या राजांवर टिप्पणी करण्यात आली आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, मांडलिक होऊन गुलामी की आपल्या मातीसाठी संघर्ष? आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जिथे तुमच्यात शिवचरित्र किती झिरपलं याचा कस लागतो…. तेव्हा कच खाल्ली, मांडलिकत्व स्वीकारलं, धाकदपटशाहीला बळी पडलात तर मात्र अशांना हा लढवय्या महाराष्ट्र माफ करत नाही. असे या पोस्टमध्ये म्हटलेले आहे.
मांडलिक होऊन गुलामी की आपल्या मातीसाठी संघर्ष?
आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जिथे तुमच्यात शिवचरित्र किती झिरपलं याचा कस लागतो…. तेव्हा कच खाल्ली, मांडलिकत्व स्वीकारलं, धाकदपटशाहीला बळी पडलात तर मात्र अशांना हा लढवय्या महाराष्ट्र माफ करत नाही. pic.twitter.com/rBYNLbtJ0M— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 28, 2024
राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेअर केलेल्या या व्हिडिओला खासदार अमोल कोल्हे यांनी आवाज दिलेला आहे. या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची महानता सांगताना मांडलिकत्व पत्करलेल्या राजांचाही उल्लेख करताना दिसत आहेत. “मिर्झाराजे जयसिंग, राजा मानसिंग यांचा इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही. कारण ते मांडलिक होते”, असा उल्लेख या व्हिडीओमध्ये आहे. शिवाजी महाराजांनी दख्खन सुभेदारी न स्वीकारत स्वराज्य वाढवले हा इतिहास व्हिडिओच्या माध्यमांतून सांगण्यात आलेला आहे.
“…म्हणून आपण आजही छत्रपतींचं नाव घेतो”
“छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात उभे होते, तेव्हा त्याला वाटत होतं की छत्रपतींनी दख्खनची सुभेदारी घ्यावी. दख्खनचा सुभा स्वराज्याच्या आकारमानाच्या तीनपट होता. त्या तुलनेने तेवढी संपत्ती होती. स्वराज्य दऱ्याखोऱ्यांचं राज्य. पण पण दख्खनचा सुभा म्हणजे मुबलक सुपीक प्रदेश. त्याला मुगल सल्तनीच्या शहजाद्याचा मान-सन्मान होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मुजरा करून त्याचं मांडलिकत्व घेण्याऐवजी आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसांसाठी ताठ मानेनं संघर्षाची वाट निवडली. म्हणूनच साडेतीनशे वर्षांनंतर आपण त्यांचं नाव घेतो”, असंही या व्हिडीओत म्हटलं आहे.
व्हिडीओच्या शेवटी खोचक टिप्पणी
या व्हिडीओच्या शेवटी खोचक शब्दांत टिप्पणी करण्यात आली असून त्यात अमित शाह यांचा उल्लेख करण्यात आला आहे. “शिवचरित्र फक्त मिरवण्यापेक्षा अंगी जिरवलं तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही. धाकदपट’शहांची’ भीती वाटत नाही”, असं व्हिडीओच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या मजकुरात म्हटलं आहे.