Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे सभा होती. त्या सभेसाठी जाताना अचानक त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. विमान लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. विमान अपघातात राजकीय नेत्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार, दोन्ही वैमानिक आणि विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विमान कंपनी VSR ने देखील लँडिंगदरम्यान धावपट्टीच्या अगदी जवळ झालेल्या अपघाताबाबत एक निवेदन जारी केले आहे. कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा, असा संशय आता कंपनीकडून व्यक्त करण्यात आला.
हेदेखील वाचा : Ajit Pawar Plane Crash: राज्याच्या राजकारणातील किंगमेकर हरपला; बारामतीच्या मातीतच राजकीय कुस्तीचे डावपेच केले आत्मसात
दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीला विशेष ओळख मिळवून दिली. बारामतीची ओळख केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘विकासाचा मॉडेल’ म्हणून झाली आहे. या विकासाच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने फक्त राजकारणातच नाही तर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैठकांसाठी अजित पवार येत होते बारामतीला
बारामती विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये बैठका नियोजित केल्या होत्या. या बैठका होण्यापूर्वीच हा अपघात झाला.






