सौजन्य - नवराष्ट्र टीम
इस्लामपूर : ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांनी जाहीर माफी मागावी नाहीतर घरातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. तर वेळ पडली तर जिथे असाल तिथे येवून बांगड्या भरू, असा सज्जड दम महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी अशी वाचाळवीर आमदारांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही केली.
कचेरी चौकात वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गावागावातून कार्यकर्ते एकत्रित झाले आहे. याप्रसंगी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला अध्यक्षा सुनिता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बँकेचे माजी अध्यक्ष शामराव पाटील, अध्यक्ष विजयराव यादव, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, युवक अध्यक्ष संग्राम जाधव, पुष्पलता खरात, विश्वजित पाटील यांच्यासह विविध संस्थाचे संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनिता देशमाने म्हणाल्या, आमदार पाटील यांची राजकारणातील कारकीर्द तुमच्या वया एवढी आहे. वाळवा तालुक्यातील महिला घरात येवून बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत. अरुणादेवी पाटील म्हणाल्या, मुख्यमंत्री यांनी असल्या आमदारांना आवर घालावा. आमदारांनी काय विकास केला आहे हे सांगावे.
याप्रसंगी विशाल माने, पुष्पलता खरात, सुनिल मलगुंडे, अशोक वाटेगावकर, पै. भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, शिवाजी चोरमुले, शैलेश पाटील, सी. व्ही. पाटील, धैर्यशील पाटील, लालासाहेब अनुसे, माणिक शेळके, शिवाजी वाटेगावकर, अर्जुन माने, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, छाया पाटील, डॉ. योजना शिंदे यांनी आमदार पडळकर यांचा जाहिर निषेध केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, आमदार पडळकर लायकी नसताना टीका करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवर घालावा. वाळवा तालुका पेटून उठल्यास प्रशासनास आवरता येणार नाही. जतमधील अभियंत्यांची आत्महत्या झाल्यावर चौकशी झाली पाहिजे, परतु अजून गुन्हा दाखल झाला नाही. आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करुन प्रशासनाचे लक्ष विचलीत करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार पडळकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
आत्महत्या प्रकरणाला बगल देण्यासाठी टीका
संजय पाटील म्हणाले, अवधूत वडर आत्महत्या प्रकरणाला बगल देण्यासाठी आमदार पाटील यांच्या कुटुंबावर टीका केली जात आहे. आमदार पाटील यांचे राजकारणात तुमच्या वयापेक्षा जास्त आहे. आता राजकारणात येऊन लायकी नसताना आमदार पाटील यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही. वाळवा तालुक्यातील महिला पडळकर यांची वाटलावल्या शिवाय राहणार नाहीत. गृहखाते कुणाच्या हातात आहे. आवर घालावा. अन्याथा वाईट परिणाम होतील.
माफी मागा नाही तर आंदोलन चालू ठेऊ
शहाजी पाटील (बापू) म्हणाले, स्वतःच्या गावात किंमत नाही. आटपाडी तालुक्यात किंमत नाही. समाजातून किंमत संपली आहे. त्यांची किंमत बिरोबाने संपविली आहे. आमदार पडळकर यांनी माफी मागावी, नाहीतर हे आंदोलन असेल चालू राहणार आहे.