सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : राज्यात ठीकठिकाणी मोठ्या नामांकित कंपन्यांच्या औद्योगिक वसाहती आहेत. मात्र तरीही दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अनेक जण आमच्याकडे नोकऱ्या मागायला येतात पण नोकरी मिळाली तर देशात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी दौंड नोकरी महोत्सव कार्यक्रम रविवारी (दि २१) पार पडला. या नोकरी महोत्सवांमध्ये जवळपास 41 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले , राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी परराज्यात जाणाऱ्या कंपन्या आणि उद्योग व्यवसाय या महाराष्ट्रात राहिल्या पाहिजेत आणि येथील स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने जागा उपलब्ध करून दिली. मी हि मुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवड सारख्या भागात बजाज या एकाच कंपनीला जागा उपलब्ध करुन दिली तर आज त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आल्या असून लाखो बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळाली.
पुणे, बारामती, दौंड यासह कोल्हापूर, सोलापूर ,सांगली, सातारा औरंगाबाद या ठिकाणीही मोठ्या औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र सध्या तरीही बेरोजगारची संख्या वाढत आहे. शेती बरोबर स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करून दुसऱ्याकडून नोकरी मागण्यापेक्षा आपण ही दुसऱ्याला कशी नोकरी देता येईल हेही पहावे. कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे, पण सध्या तरुण आणि तरुणी आपल्या गावाजवळ सोयीनुसार नोकरी पाहिजे त्यासाठी धडपड करतात. पण नोकरी करायची असेल तर दुसऱ्या राज्यात जाण्याची तयारी पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होताल असा सल्ला माजी कृषिमंत्री पवार यांनी यावेळी उपस्थित तरुण आणि तरुणींना दिला.
याप्रसंगी शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे नेते जगन्नाथ शेवाळे, युगेंद्र पवार तसेच विविध नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.