पुणे : हवेली (पुणे ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Haveli Agricultural Produce Market Committee) संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने (Shetkari Vikas Aghadi) बाजी मारली आहे. आघाडीने 18 पैकी 13 जागा जिंकत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनेला धोबीपछाड दिला. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ग्रामपंचायत गटात दोन जागा मिळाल्या असून, या संचालक मंडळात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपने अनपेक्षितपणे प्रत्येकी तीन जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.
संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. एकोणीस वर्षानंतर निवडणुक होत असल्याने मतदान उत्साहात पार पडले होते. शनिवारी महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात मतमोजणी पार पडली. पहिला निकाल हा हमाल-मापाडी गटातील जाहीर झाल्यानंतर सभागृहाच्या परिसरात जल्लोषाला सुरुवात झाली. शेवटच्या जागेचा निकाल दुपारी चारच्या सुमारास जाहीर होईपर्यंत या भागात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण सुरु होती.
संचालक मंडळात सर्वांत जास्त जागा सेवा सहकारी संस्था मतदारसंघात होत्या. या गटातील सर्वसाधारण गटातील सात जागा, इतर मागास वर्ग आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक आणि महिला गटातील दोन्ही जागा मिळवित यश संपादन केले. एकूण अकरापैकी अकरा जागा शेतकरी विकास आघाडीला मिळाल्या.
ग्रामपंचायत मतदार संघात शेतकरी विकास आघाडी आणि सहकार पॅनेल यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. यामध्ये सर्वसाधारण गटात शेतकरी आघाडीचे सुदर्शन चौधरी आणि सहकार पॅनेलचे रामकृष्ण सातव हे विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात शेतकरी आघाडीचे रविंद्र कंद आणि अनुसूचित जाती-जमाती गटातून नानासाहेब आबनावे हे सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी झाले.
सेवा सहकारी संस्था मतदारसंघात माजी सभापती रोहिदास उंद्रे, दिलीप काळभोर, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, नितीन दांगट, दत्तात्रय पायगुडे हे सर्वसाधारण गटातून विजयी झाले. मागास प्रवर्गातील शशिकांत गायकवाड, भटक्या जाती विमुक्त जमाती गटातून लक्ष्मण केसकर आणि महिला गटातून मनीषा हरपळे आणि सारिका हरगुडे हे विजयी झाले.
शेतकरी विकास आघाडीची एकहाती सत्ता
अठरा जागांपैकी तेरा जागा जिंकून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळविली आहे. त्यांच्या विजयात माजी सभापती प्रकाश जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आणि माजी नगरसेवक विकास ऊर्फ नाना दांगट यांची भूमिका महत्वाची ठरली. दांगट यांनी भाजप आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांना सोबत घेत शेतकरी विकास आघाडी स्थापन केली होती. त्यांच्या या कृतीला पक्षविरोधी कारवाई म्हणून संबोधित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दांगट यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर दांगट यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने हा दणदणीत विजय मिळविल्याने त्याचा हवेली तालुक्यातील पुढील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे.
भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचा फायदा
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुर्वीपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व होते. यावेळी संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने काही जागा जिंकत बाजार समितीच्या राजकारणात प्रवेश केला आहे. यामध्ये भाजपचे रविंद्र कंद, सुदर्शन चौधरी, रोहिदास उंद्रे यांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे रामकृष्ण सातव, प्रशांत काळभोर, सारीका हरगुडे यांना संचालक मंडळात स्थान मिळाले आहे.
घुले, भोसले यांचा एकतर्फी विजय
बाजार समितीच्या संचालक मंडळात आडते – व्यापारी या गटातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या गटात माजी संचालक गणेश घुले आणि आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बापू भोसले यांनी विक्रमी मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवांरावर विजय मिळविला. घुले आणि भोसले यांनी जय शारदा गजानन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली होती.