शेवगावात निसर्गाची क्रूर विटंबना! हजारो झाडांची कत्तल, शेकडो टन लाकूड वखारीत; अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
पोपट पिटेकर, शेवगाव: एकीकडे राज्य शासन “झाडे लावा, झाडे जगवा” असा नारा देऊन कोट्यवधी रुपये पर्यावरणाच्या संवर्धनावर खर्च करत असताना, दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मात्र निसर्गाची अत्यंत क्रूर आणि भीषण कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात हजारो झाडांची अवैध कत्तल करून शेकडो टन लाकडाचा साठा गेवराई रोडवरील वसीम शेख यांच्या वखारीवर साचवण्यात आला आहे. या संपूर्ण पर्यावरणाच्या विनाशाकडे वनविभागाचे अधिकारी डोळे झाकून बघ्याची भूमिका घेत असल्याने, “शेवगावचा वनविभाग फक्त कागदावरच उरलाय का?” असा संतापजनक सवाल नागरिक विचारत आहेत.
शेवगाव परिसर आणि आसपासच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. निष्पाप अन् मुक्या झाडांचा बळी देऊन लाकूड माफिया आपले खिसे भरत आहेत. या अवैध लाकूड तस्करीला आणि हजारो झाडांच्या बळीला वनविभागाचे अधिकारी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे अभय देत आहेत का, असा संशय आता बळावला आहे. वनविभागाच्या या ‘कुंभकर्णी’ झोपेमुळे नागरिकांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि माफियांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
या गंभीर आणि जीवघेण्या प्रकारानंतर आता माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत प्रथम पुरस्कार प्राप्त ‘आदर्श ग्रामपंचायत वाघोली’ अत्यंत आक्रमक मोडमध्ये आली आहे. ग्रामपंचायतीने बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात थेट अंतिम कडक नोटीस जारी करत माफियांसह निष्काळजी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की…
पूर्वपरवानगी अनिवार्य: ग्रामपंचायत हद्दीतील खाजगी किंवा सार्वजनिक जागेतील झाडे तोडण्यापूर्वी ग्रामपंचायतीची अधिकृत परवानगी (NOC) घेणे बंधनकारक आहे.
वखारींना बंदी: कोणत्याही परवानगीशिवाय तोडलेले लाकूड खरेदी-विक्रीसाठी वखारीत स्वीकारल्यास वखार मालकावर कडक कारवाई होईल.
‘मनुष्यवधाचा गुन्हा’: विनापरवानगी आणि निष्काळजीपणे तोडलेल्या झाडांमुळे किंवा तोडणीदरम्यान अपघात होऊन एखादी जीवितहानी घडल्यास, संबंधित तोडणाऱ्या व्यक्तीवर, लाकूड वखार मालकावर भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमान्वये ‘मनुष्यवधाचा गुन्हा’ दाखल केला जाईल
वखार सील आणि दंडात्मक कारवाई: बेकायदेशीर लाकूड आढळल्यास वखार तातडीने सील करून फौजदारी कारवाई करण्यात येईल.
“ग्रामपंचायतीच्या पूर्वपरवानगीशिवाय सुरू असलेली ही वृक्षतोड मानवी जीवितास आणि पर्यावरणास अत्यंत धोकादायक आहे. निसर्गाचा विनाश करणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या माफियांसह याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही! अशी प्रतिक्रिया वृक्षप्रेमी उमेश भालसिंग यांनी दिली.
पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना शेवगावात सुरू असलेला हा लाकूड तस्करीचा गोरखधंदा थांबणार की प्रशासकीय अधिकारी नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवत गप्प बसणार? वाघोली ग्रामपंचायतीने उचललेल्या या आक्रमक पावलामुळे आता लाकूड माफियांचे आणि ढिम्म वनविभागाचे धाबे दणाणले आहेत.






