'आमदार-खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आता त्यांच्यासाठी...'; संजय गायकवाड यांची इच्छा (फोटो -सोशल मीडिया)
बुलढाणा: बदलापूरच्या शाळेत झालेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरच्या नागरिकांनी थेट रेल रोको करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यांसाठी आंदोलन केले. त्यादिवशी संपूर्ण बदलापूर रस्त्यावर उतरलं होते.त्या दिवसापासून राज्यात दररोज महिला आणि बाल अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीनं बंद मागे घेत ठिक-ठिकाणी तोंडाला काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून आंदोलन केलं.
राज्यभरातून अशा घटना सातत्याने समोर येत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. बदलापूर घटनेवर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी काय शाळेत जाऊन पाहारा देत बसायचं का, असा सवाल उपस्थित केला आहे.त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
हेदेखील वाचा: शिवरायांचा पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्टर जयदीप आपटे, केतन पाटीलवर गुन्हा दाखल
बदलापूर घटनेनंतर बुलढाणा जिल्ह्यातही अशीच घटना समोर आली. या घटनेवरून संजय गायकवाडांना विचारले असता गायकवाड म्हणाले, “मी कालचं आंदोलन पाहिले, सगळे पक्ष त्यावर थयथयाट करत होते. ही एक प्रवृत्ती असते. पण ज्या हरामखोंना त्या लेकीचं वय कळत नाही. पण हे सगळे लोक हे सरकारने केलं म्हणून ओरडत होते. पण मग आता मुख्यमंत्र्यांनी काय शाळेत जाऊन पाहारा द्यायचा का, पोलिस अधीक्षक आरोपीच्या घरी जाऊन बसणार का? की आरोपी सांगणार मी बलात्कार करणार आहे, मला पकडायला या” जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी पोलीस यंत्रणाच काम करते, काही घटनांमध्ये सीबीआय काम करते. पण आरोपीला सोडले जात नाही. त्यामुळे अशा घटनांवर राजकारण करण्यापेक्षा त्या आरोपीला शिक्षा होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पण त्यावर राजकारण करण्यापेक्षा अशा नराधमांना शिक्षा कशी मिळेल, हे पाहिलं पाहिजे.
संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशीच वक्तव्य केली आहेत. धमक्या देणे, मारहाण करणे अशा प्रकरणांमुळे ते कायम चर्चेत असतात. पण बदलापूर प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होते असतानाच संजय गायकवाडांनीही असे अशोभनीय विधान केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करणार, याकडेसर्वांचे लक्ष लागले आहेत
हेदेखील वाचा: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला बसला दणका; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा
संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वाढदिवसामुळेही ते चांगचेच चर्चेत आले होते. बुलढाण्यातील जैस्तंभ चौकात मुलाच्या वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून भरवला होता. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता.