मुंबई – शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांचे कुर्ल्यातील कार्यालाय फोडले तसेच नगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासल्यानंतर गृहविभाग दक्ष झाला असून राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते शिंदे गटाच्या गटात सामील झाले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुडाळकर यांच्या विरोधात मोर्चा उघडला. आज मुंबईतील त्यांच्या कार्यालयावर चाल करून त्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागाची तोडफोड केली.
अहमदनगरमध्ये आज शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसले त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे शहरात असलेल्या एका पोस्टरवर काळे फासले. त्यानंतर त्यांनी शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेषत: मुंबईतील पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. शांतता नांदावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.