कोल्हापूर : ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है’,च्या घोषणा देत माजी शिवसेना शहरप्रमुख (कोल्हापूर) रविकिरण विष्णूपंत इंगवले व रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचे डिजिटल फलकवरील छायाचित्र फाडून टाकले.
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षाने आमदार केले. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पद दिलं, एका सामान्य कार्यकर्त्याला इतके देऊनही शिवसेना पक्षाशी गद्दारी केली. तसेच पक्षाच्या नावावर जोगवा मागून पक्षाने मंत्रिपद दिले, गार्ड दिले, कार्यालय दिले, वैभव दिले. इतके सर्व देऊनही बकासूर राक्षसासारखी भूक असणाऱ्या राजेश क्षीरसागरचा अहंकार जिरवू व पक्षाच्या नावावर गब्बर झालेल्या पिता-पुत्रांना धडा शिकवू, असे यावेळी सांगितले.
राजेश क्षीरसागरने जबरदस्तीने व पक्षाच्या बदनामीचा जराही विचार न करता नगरपालिकेची जागा बळकावून विभागीय कार्यालयाच्या नावाखाली पक्षाच्या नावाने जे टेंडर कार्यालय काढले होते. त्यावरील राजेश क्षीरसागर यांचा फोटो असलेले फलक रविकिरण इंगवले यांनी फाडावयास लावले.
माजी आमदार राजेश क्षीरसागर, विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात कोल्हापूरकरांकडून दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आजी व माजी या दोन्ही कंधार आमदारांच्या विरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी शहरात गेली होती.
तसेच फुटीर आमदारांचा निषेधही करण्यात आला होता. शिवसेना माजी शहरप्रमुख, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी डिजिटल फलक काढून टाकल्याने कट्टर शिवसैनिक कसा असतो, हे दाखवून दिले आहे.