देहूरोड : साईनगर, मामुर्डी येथे ऐन दिवाळीत गो हत्या करणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि युवा सेना यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. तसेच या कारवाईबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देहूरोडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या प्रसंगी शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, युवा सेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, माजी शहरप्रमुख राजेश शेलार, माजी उपतालुका प्रमुख बबन पाटोळे, शिवसेना विभागप्रमुख विजू थोरी, शहर सल्लागर विलास हिनुकूले आदी उपस्थित होते. दरम्यान, गो हत्या प्रकरणाचा शिवसेनेतर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. अशा गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर होत असतो. मात्र, देहूरोड पोलिसांनी केलेल्या दमदार कारवाईमुळे या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळू शकला नाही. त्यामुळे चारही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. देहूरोड पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे. यापुढेही अशाच पद्धतीने अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या कारवाया सुरु ठेवाव्यात. शिवसेना, युवासेना पोलिसांसोबत खंभीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही, तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी दै. नवराष्ट्रशी बोलताना दिली.