बुधवारी मुंबई येथील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पारपडला. या मेळाव्यात महाराष्ट्रभरातून दसरा मेळाव्याकरीता जनसागर लोटला होता. यावेळी उद्धव ठाकरें विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तोफ दणाणली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thakery) यांचा चांगलाच समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना ही काही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसेना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घामातून बांधली गेली आहे. ती कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. ही लिमिटेड कंपनी नाही. ही शिवसैनिकांची शिवसेना आहे. आम्हाला काय काय म्हणून हिणवलं. आम्हाला डुकरं म्हटलं. प्रत्येकाने आपला तालुका शिवसेनामय केला नसता तर तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचला असता का?, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणातून उद्धव ठाकरे यांना विचारला.
बाळासाहेब म्हणायचे हे शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. लाखो गेले. आमदार गेले. खासदार गेले. तरी मीच आहे. अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत. हे दुर्देव आहे महाराष्ट्राचं. तसेच आम्ही पूर्वी पोटापाण्यासाठी जे व्यवसाय केले त्याची तुम्ही खिल्ली उडवताय. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. टपरीवाला मंत्री होऊ शकत नाही का?. सरंजामदार, भांडवलदार आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलेच मुख्यमंत्री होऊ शकतात का? ही काय तुमची जहागिरदारी आहे का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
चहावाला पंतप्रधान झाला. म्हणून खिल्ली उडवणारा पक्षच जागेवर नाही. त्या पक्षाची अवस्था काय झाली. त्यांना अध्यक्ष मिळत नाही. पक्ष आहे पण अध्यक्ष नाही. इथे अध्यक्ष आहे, पण पक्षच नाही. अफाट जनसागर येथे आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जनसागराचे दर्शन घडवा. मनातला गोंधळ संपला असेल. खरी शिवसेना कुठं आहे. हे या मेळाव्यातून दिसते. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण याचा प्रश्न आता कुणालाही पडणार नाही, असंही शिंदे म्हणाले.