Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेत महत्त्वाची अपडेट; इन्कम टॅक्स विभागाशी सामंजस्य करार होणार
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेमुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चांगले यशही मिळाले आहे. पण, या योजनेच्या निधी वाटपावरून टीका केली जात आहे. योजनेतील निधीवरून महायुतीतूनच तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे आता या योजनेचे भवितव्य अंधारात असल्याचे म्हटले जात आहे.
लाडकी बहीण योजनेवर होणारा प्रचंड खर्च, अपात्र लाभार्थ्यांकडून लाभ घेतल्याच्या तक्रारी आणि सामाजिक न्याय तसेच आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता महायुतीमधीलच शिवसेना (शिंदे गट) आमदार आमश्या पाडवी यांनी या योजनेविरोधात थेट आक्षेप नोंदवला आहे. पाडवी यांनी योजनेच्या अंमलबजावणीमुळे आदिवासी समाजाचे नुकसान होत असल्याचा दावा केला असून, याबाबत विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवण्याचा इशारा दिला आहे.
आमश्या पाडवी यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली आहे. पण यामुळे आदिवासींचा निधी दुसरीकडे वळवला जात आहे. याबाबत मी सरकारला पत्र दिले आहे आणि जर आमचा निधी बहिणींसाठी वापरला जाणार असेल, तर हाच मुद्दा अधिवेशनात मांडेन, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
इतर सरकारी योजनांना बसतोय फटका
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मासिक आर्थिक मदत देणारी योजना असली, तरी तिच्या अंमलबजावणीसाठी लागणारा प्रचंड खर्च आणि अपात्र व्यक्तींकडून लाभ घेतल्याच्या तक्रारींमुळे ती सातत्याने चर्चेत आहे. योजनेच्या १२ व्या हप्त्यासाठी नुकतेच ३३५.७० कोटी रुपये आदिवासी विकास विभागातून आणि ४१० कोटी रुपये सामाजिक न्याय विभागातून वळवण्यात आले आहेत. यामुळे या विभागांच्या अन्य योजनांना मोठा फटका बसत असल्याची टीका होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा एकूण १,८२७ कोटींचा निधी वळवण्यात आला आहे.