नायलॉन मांजा थरतोय घातक (फोटो- istockphoto)
चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा
पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’
अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे हे अभियान
पुणे: “पतंगोत्सव आनंदाचा असावा, पण त्यातून कोणाचाही मृत्यू होता कामा नये,” असा माणुसकीचा संदेश देत पक्षी, प्राणी आणि माणसांचे प्राण वाचवण्यासाठी डॉ. कल्याण गंगवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’ राबविण्यात येत आहे. हे अभियान ३१ जानेवारीपर्यंत सुरू असून सर्वजीव मंगल प्रतिष्ठान पुणे, रेस्क्यू वाईल्ड लाईफ आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील परदेशी यांच्या सहकार्याने हा उपक्रम साकारत आहे. परमपूज्य आचार्य विद्यासागर महाराज आणि परमपूज्य मुनि १०८ प्रमाण सागर महाराज यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने हे अभियान अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.
मकरसंक्रांतीच्या काळात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या उत्सवात वापरला जाणारा चायनीज नायलॉन मांजा पक्षी, प्राणी तसेच नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. डॉ. गंगवाल यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, बाजारात उपलब्ध असलेल्या या मांज्यावर काच लावलेली असल्याने तो हाताने सहज तुटत नाही. त्यामुळे उडणारे पक्षी या मांज्यात अडकून गंभीर जखमी होतात किंवा आपला जीव गमावतात.
मागील वर्षी चायनीज मांज्यामुळे हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती देत, या मांज्यामुळे सुमारे २१५ नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे गळे कापले जाणे, नागरिक जखमी होणे अशा अनेक गंभीर घटना घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘मांजा हटवा, जीव वाचवा’ या संदेशासह रेस्क्यू अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत सुसज्ज रुग्णवाहिका, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमी पक्षी व नागरिकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. उपचारानंतर पक्ष्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणात सोडण्यात येते. झोपडपट्टी व वस्ती भागात जखमी झालेल्या नागरिकांनाही विनामूल्य वैद्यकीय मदत दिली जात आहे.
नायलॉन मांजाची विक्री करताय? तर सावधान ! तब्बल अडीच लाखांचा दंडच आकारला जाणार
चायनीज मांज्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही त्याची सर्रास विक्री सुरू असल्याची खंत व्यक्त करत, नागरिकांनी सजग राहून अशा विक्रेत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले. अहिंसा आणि जीवदयेचा मार्ग स्वीकारून पक्षी, प्राणी आणि माणसांचे प्राण वाचवणे हीच खरी मानवता आहे, असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.






