फोटो - सोशल मीडिया)
लोकसभा निवडणुतीत मोठं यश मिळालेल्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत मात्र धुव्वा उडाला. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारा आकडाही गाठता आला नाही. अवघ्या 49 जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे महायुतीनं 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकत मोठी मजल मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सध्या नैराश्याचं वातावरण आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी नवीन नर्षात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप महायुतीत मोठा भाऊ ठरला आहे. तर त्याचमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नाराज,अस्वस्थ नेतेमंडळी महायुतीतील पक्षांमध्ये उडी मारण्याच्या विचारात आहे.
त्यात भाजपचा पर्याय सध्या अनेकांना फायद्याचा वाटतो आहे. त्याचमुळे फायरब्रँड नेत्यासह माजी आमदार, 5 माजी नगरसेवक,कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
नव्या वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेतील 5 माजी नगरसेवक हे येत्या 5 जानेवारीला हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा भाजप प्रवेश हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका असणार आहे.
शिवसेनेतील पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.त्यात पुण्यातील खासदार श्रीरंग बारणे,विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे,आमदार विजय शिवतारे,श्रीरंग बारणे या नेतेमंडळींचा समावेश आहे.
आता आगामी महापालिका निवडणुकांच्या आधीच माजी नगरसेवकांनीही पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा एक विश्वासू व फायरब्रँड नेत्यासह माजी आमदार,काही माजी नगरसेवकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी 50 हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेना उबाठाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेतील बंडानंतर एकीकडे एकनाथ शिंदेंनी यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत पक्ष उद्धव बळकटीसाठी प्रचंड जोर लावला आहे.तसेच त्यांनी आपल्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रोत्साहन,पाठबळ दिलं जातं.त्यात पुण्यातही त्यांनी आगामी निवडणुकीच्या धर्तीवर लक्ष घातलेलं आहे.तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पुण्याबाबत जास्त अॅक्टिव्ह नसल्याचं पाहायला मिळत आहे.
त्याचमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही माजी नगरसेवकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे.पक्षश्रेष्ठींकडून कोणतीही मदत मिळत नसल्यानं या नाराज नेते आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनाUBT पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहेत.