दिल्ली भेटीतील एकनाथ शिंदे यांचा नाराज फोटो सोशल मीडियावर व्हायरल (फोटो - एक्स)
दिल्ली : राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. महाराष्ट्राचे राजकारणाची चर्चा दिल्लीपर्यंत गेली आहे. भाजप पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्य मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून अजित पवार यांनी देखील फडणवीसांचे नेतृत्व मान्य केले आहे. या भेटीनंतर एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राज्यातील महायुतीचे तिन्ही प्रमुख नेत्यांनी दिल्लीवारी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेते जे.पी.नड्डा हे देखील बैठकीवेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे पुढचे सरकार, त्यातील मंत्री, विविध पालकमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला आहे. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ते हताश असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या व्हायरल फोटोमध्ये अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे दिसून येत आहे. दिल्ली भेटीतील या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांचा न हसलेला आणि फडणवीस यांचा हसलेला फोटो पाहून राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या फोटोतील बॉडी लँग्वेज वरुन ते नाराज असल्याचा दिसत आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्यास इच्छूक होते. मात्र, भाजपने ही मागणी मान्य न केल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
दिल्लीमधील या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंद म्हणाले की, मी कधी गंभीर, कधी हसरा हे तुम्ही ठरवता. मी आजही खुश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही इतकं बहुमत मिळाले नव्हते, याचा अर्थ काय सरकारवर जनता खुश आहे. जनतेच्या आनंदातच आमचा आनंद आहे. बैठक अतिश्य सकारात्मक झाली, पुन्हा उद्याही बैठक होईल. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल. मी आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतोय. लाडकी बहीण फेमस आहे, सख्खा लाडका भाऊ माझी नवीन ओळख निर्माण झाली आहे. सगळ्या पदांपेक्षा ते मोठं पद आहे माझ्यासाठी. आजच्या बैठकीत साधकबाधक चर्चा झाली. उद्याही आमची बैठक होईल आणि दोन दिवसांत निर्णय होईल, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
Expressed my gratitude to Hon Union Minister Shri Amitbhai Shah, for his huge support on the battlefield during the important Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 and for the way he greatly inspired and motivated the karykartas.
On this occasion, our BJP National President JP… pic.twitter.com/KAd341ANtw— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2024
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन फोटो शेअर केले. अजित पवार यांनी लिहिले आहे की, ‘देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन केले.’ तर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की,’ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून या महत्वाच्या लढाईमध्ये जी साथ मा. केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांनी दिली आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, प्रेरणा दिली याबद्दल त्यांचे आज नवी दिल्ली येथे मनःपूर्वक आभार मानले !’ असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.