File Photo : Maharashtra Politics
मुंबई : राज्यात महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली केल्या जात आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल, हे निश्चित झाल्याची माहिती आहे. असे जरी असले तरी मागील सरकारमध्ये जे झालं ते नव्या सरकारमध्ये होणार नाही. त्यादृष्टीनेच भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : राज्याचा मुख्यमंत्री अखेर दिल्लीने ठरवला ! अमित शहांकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब, शपथविधीही ठरला?
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या महायुतीला चांगले यश मिळाले आहे. महायुतीने बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यामुळे आता राज्यातील मुख्यमंत्री कोण? यासह कोणत्या पक्षाला किती आणि कोणती खाती यासंदर्भात दिल्ली दरबारी चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. लवकरच त्याची औपचारिक घोषणा केली जाईल. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला संमतीही दिली.
दरम्यान, दिल्लीतील बैठकीनंतर भाजप आपली निरीक्षक टीम मुंबईला पाठवणार आहे. मुंबईत होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनीदेखील भाजपचे वरिष्ठ मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घेतील, तो त्यांना मान्य असेल, असे स्पष्ट केले होते.
उपमुख्यमंत्रिपद फक्त एकनाथ शिंदे यांच्यासाठीच
मागील महायुती सरकारमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्यानंतरही 2022 पासून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. आता नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेनेतील केवळ एकनाथ शिंदे यांच्यासाठीच असेल, अन्य व्यक्तीचा विचार होणार नाही, असे भाजपतर्फे स्पष्टच सांगण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंचं नाव पुढे
एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी पुढे केल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, भाजपने हा प्रस्ताव फेटाळला असून, नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतील अन्य कोणत्याही नेत्याचे नाव चालणार नाही. केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव चालणार आहे, असे भाजपने स्पष्टच बजावल्याचे समजते.
हेदेखील वाचा : महाराष्ट्राने वाढवला दिल्लीचा पारा; गारठलेल्या राजधानीत महायुतीच्या नेत्यांच्या हाय व्होल्टेज बैठका