मुंबई : सध्या कंगना राणौत ही चर्चेमध्ये आली आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कंगनाला एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने कंगनाला कानाखाली मारल्याची घटना घडली. चंदीगड विमानतळावर मंडीच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला थप्पड लगावली. या कॉन्स्टेबलच्या तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून तिला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हे प्रकरण देशभरामध्ये चर्चिले जात आहे. या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा हातात घेतला
कंगनाला मारहाण झाल्याच्या प्रकरणावर खासदार संजय राऊत म्हणाले, “जर त्या कॉन्स्टेबलने असं सांगितलं असेल की तिची आई तिथे बसली होती, तर ते खरं आहे. तिची आई शेतकरी आंदोलनात सहभागी झाली असेल आणि आईबद्दल कोणी चुकीचं बोलत असेल तर नक्कीच लोकांच्या मनात चीड येते, संताप येतो, क्रोध येतो. जर मोदीजी म्हणतात की कायद्याचं राज्य आहे तर कायदा हातात नाही घेतला पाहिजे. कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा हातात घेतला. भारत मातासुद्धा त्यांची आई आहे आणि जे शेतकरी आंदोलनाला बसले होते, ते भारतमातेचे पुत्र होते, कन्या होत्या. जर कोणी भारतमातेचा अपमान केला असेल आणि कोणाला राग आला असेल तर मला असं वाटतं की त्याविषयी विचार केला पाहिजे,” असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
खासदारावर हात उचलणं ठीक नाही
कंगनाविषयी सहानुभूती व्यक्त करत राऊत पुढे म्हणाले, “मला कंगनाविषयी सहानुभूती आहे. त्यासुद्धा खासदार आहेत आणि खासदारावर अशा पद्धतीने हात उचललं नाही पाहिजे. मात्र या देशात शेतकऱ्यांचा आदर झालाच पाहिजे, मग ते शेतकऱ्यांचे पुत्र असोत किंवा कन्या असोत. लोकांच्या मनात अजूनही किती राग आहे, हे समजून घेतलं पाहिजे. कंगनाने मुंबईला पाकिस्तान म्हटलं होतं. तेव्हासुद्धा लोकांचा राग अनावर झाला होता. राग येण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच नाही तर आम्हालासुद्धा आहे. पण खासदारावर अशा पद्धतीने हात उचलणं ठीक नाही.” असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.