कल्याण : आंबिवली ते टिटवाळा दरम्यान धावत्या लोकलमध्ये 10 वर्षीय मुलीचा हात पकडून तिची छेड काढणाऱ्या विकृत तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशाल सिंग असे या तरुणाचे नाव आहे. विशाल हा सराईत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आंबिवली ते टिटवाळा दरम्यान काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लोकलमधील लगेजच्या डब्यात एका 65 वर्षीय इसमाबरोबर त्यांची दहा वर्षाची नात प्रवास करत होती. याच डब्यात एक तरुण देखील होता. दहा वर्षाच्या चिमुकलीकडे बघून या तरुणाने तिचा हात धरला त्यानंतर अश्लील हाव भाव करत मेरे साथ चल असे बोलला. मुलीच्या आजोबांचे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ याबाबत रेल्वे पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. टिटवाळा रेल्वे स्थानकात आरपीएफ व कल्याण रेल्वे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. विशाल सिंग असे तरुणाचे नाव आहे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. विशाल हा मोबाईल चोर असल्याचे माहिती तपासात समोर आली.