शिरोलीत 'शोले स्टाईल' तरुणाचे आंदोलन; पाण्याच्या टाकीवर चढला अन्...
शिरोली : कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर असताना हद्दवाढीविरोधात व समर्थनात वातावरण तापलेले आहे. मागील आठवड्यात न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार-खासदार यांची बैठक झाली होती. त्यावेळी सर्वानुमते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हद्दवाढीच्या बाजूने सर्वानुमते निर्णय घेण्याचे ठरले होते. दरम्यान, गावांतील तरुण पिढीने पुढाकार घेऊन अनोखे आंदोलन केले.
पुलाची शिरोली येथे पुणे-बंगळुरू महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल सुमारे तासभर आंदोलन केले. मंगळवारी मुंबई येथे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होत आहे. या बैठकीत हद्दवाढीसंदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर २० गावांमध्ये हद्दवाढीविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
पुलाची शिरोली येथे व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शविला आहे. गावांतील तरुण पिढीने पुढाकार घेऊन अनोखे आंदोलन केले. पुलाची शिरोली येथे पुणे-बेंगलोर महामार्गांलगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल सुमारे तासभर आंदोलन केले. ‘शिरोली आमच्या हक्काची-नाही कुणाच्या बापाची, हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आजच्या गावबंदमध्ये गावातील राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने या लोकप्रतिनिधींना हद्दवाढ हवी आहे काय? हद्दवाढीला समर्थन आहे असे समजायचे का? असा संतप्त सवाल तरुणांनी उपस्थित केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी आंदोलनकर्त्यांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.