जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान (फोटो- सोशल मीडिया)
देहूगांव: पंढरीची वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थव्रत… या ओवीप्रमाणे वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागली असून, आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज (ता. १८) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या निमित्ताने देऊळ वाडयाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी देहूमध्ये दाखल झाले असून, देहूनगरीत भक्तीचा महापूर ओसंडला आहे.
या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज, गणेश महाराज मोरे सांगितले. ते म्हणाले, यंदाचा पालखी सोहळा ३४० वा आहे. प्रस्थान सोहळा दुपारी अडीच वाजता मुख्य देऊळवाडयातील भजनी मंडपातून सुरू होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, त्याला उजाळा देण्यात आला आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या ५०० दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. यंदा संस्थानने तीन बैलजोडी स्वतः खरेदी केल्या आहेत.
असा असेल प्रस्थान सोहळा
पहाटे ५ वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे ,पालखी सोहळा प्रमुख हभप दिलीप महाराज मोरे ,वैभव महाराज मोरे ,गणेश महाराज मोरे ,विश्वस्त उमेश महाराज मोरे ,विक्रमसिंह महाराज मोरे मोरे ,आणि लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा व आरती होणार आहे.
पहाटे ५ :३० वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिर या ठिकाणी अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे ,विश्वस्त उमेश महाराज मोरे ,विक्रमसिंह महाराज मोरे व लक्ष्मण महाराज मोरे यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात येणार आहे.*
सकाळी ९ ते ११ श्री तुकोबारायांच्या पादुकांची पूजा इनामदार साहेब वाड्यात करण्यात येणार आहे त्यानंतर परंपरेनुसार संस्थानच्या वतीने या पादुका डोईवर घेऊन मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या जातील.
सकाळी १० ते १२ पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा सप्ताहाची संगता होईल.
दुपारी २:३० वाजता ,प्रमुख मान्यवर व महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी भाविक भक्तांच्या हस्ते संत तुकोबांच्या पादुकांना महाभिषक घालून महापूजा करण्यात आल्या नंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होईल.प्रमुख दिंड्याच्या उपस्थित आणि वारकरी भाविक भक्तांच्यासह हरिनामाच्या गजर करत टाळ मृदंगाच्या निनादात ,गरुड , टक्के यांचा समवेत सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळ्याचे मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातुन प्रस्थान होईल ,आणि सायंकाळी ६ : ३० वाजता जगसगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदार साहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन , हरिणाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.