साताऱ्यातील कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे उघडले जाणार आहेत (फोटो - सोशल मीडिया)
पाटण : मुंबईसह राज्यभरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक शहरांना रेड व यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी रविवारी दुपारी ४ वाजता धरणाचे ६ वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून प्रतिसेकंद १० हजार व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २ हजार १००, असे प्रतिसेकंद एकूण १२ हजार १०० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले.
मात्र तरीही धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने सोमवारी दुपारी ४ वाजता धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फूट उघडून १९ हजार २०० क्युसेक्स पाणीविसर्ग करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून सुरू असलेला २ हजार १०० क्युसेक्स व धरणातून सोडण्यात येणारा १९ हजार २०० क्युसेक्स असा एकूण २१ हजार ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. हा विसर्ग व पूर्वेकडील विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय व धोकादायक वाढ झाल्याने नदीकाठची गावे व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोयना छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून धरणात प्रतिसेकंद ३८ हजार ८०३ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात सध्या ९५.५८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ ९.६७ टीएमसी इतक्या पाण्याची गरज आहे. सध्यस्थिती लक्षात घेता समुद्रसपाटीपासून पाण्याची उंची २१५६ फूट, जलपातळी ६५७.१४९ मीटर इतकी झाली आहे.
सोमवारी सकाळी ८ पर्यंत २४ तासात व १ जूनपासून पडलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे. कोयना ११३ (३४६६), नवजा १५१ (४११९), महाबळेश्वर १२१ (४०४९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ८ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार बरसण्यास सुरुवात केली आहे. धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने रोजी आज सकाळी ११ वाजता नीरा नदीच्या पात्रात १ हजार८०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार. यामध्ये दुपारी १२ वाजता वाढ करून तो ६ हजार २३८ क्यूसेक करण्यात येणार. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पुणे शहराला देखील हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.