फोटो सौजन्य सोशल मीडिया
Solapur News , शहर प्रतिनिधी. महानगरपालिकेच्या कामगार कल्याण व समाजकल्याण समितीच्या नवनियुक्त सभापती श्रद्धा पवार यांनी पदभार स्वीकारताच दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांच्या त्रैमासिक उदरनिर्वाह भत्त्यात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून, आता हा भत्ता २ हजार रुपयांवरून २ हजार ५०० रुपये करण्यात आला आहे. या निर्णयाचा शहरातील २ हजार ८६२ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून, त्यांच्या बँक खात्यात एकूण ७१ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आल्याचे सभापती श्रद्धा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे दिव्यांगांना मिळाली श्रद्धेची पॉवर अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध; ‘रक्त सांडू पण आदिनाथ विकू देणार नाही’
महापालिकेच्या नियमानुसार ४० ते १०० टक्के दिव्यांगत्व असलेल्या पात्र लाभार्थ्यांना त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता दिला जातो. दिव्यांग संघटना व संस्थांकडून सातत्याने भत्त्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे श्रद्धा पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगरसेविका राजश्री दोडमणी, किरण पवार, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, लिपिक शिवराम मोटे, माऊली आडकुर आणि प्रभाकर कदम उपस्थित होते.
महापालिकेच्या लाभार्थ्यांमध्ये अस्थिव्यंग १ हजार ४८९, कर्णबधिर २९०, मूकबधिर १२१, मतिमंद ५८८ आणि अन्य दिव्यांग ३७४ अशा एकूण २ हजार ८६२ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने ५ टक्के दिव्यांग निधीतून ३ कोटी १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षातील ३ लाख ४४ हजार १४८ रुपयांचा शिल्लक निधी कॅरी फॉरवर्ड करण्यात आला असून, दिव्यांग कल्याणासाठी एकूण ३ कोटी १३ लाख ४४ हजार १४८ रुपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून २ कोटी ८६ लाख २० हजार रुपये उदरनिर्वाह भत्त्यासाठी, १० लाख रुपये मालमत्ता करातील ५० टक्के सवलतीसाठी, १० लाख २४ हजार १४८ रुपये मोफत एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षणासाठी आणि ७ लाख रुपये फिजिओथेरपी केंद्रासाठी मनुष्यबळ व साहित्य खरेदीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
महानगरपालिका दिव्यांगांसाठी मोफत एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षण सुरू करणारी राज्यातील पहिली महापालिका ठरणार असल्याचा दावा श्रद्धा पवार यांनी केला. तसेच १५ ऑगस्ट रोजी उत्कृष्ट काम करणाऱ्या महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. एएलआयएमसीओ संस्थेच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी विविध सहाय्यभूत उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले






