सोलापूर : जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) हे वापरात असलेल्या गाडीचे भाडे देण्यासाठी लोकशासन आंदोलन पार्टीच्या (Lokshasan Andolan Party) कार्यकर्त्यांनी गुरुवारी भीक मागून सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मार्च अखेर मुदत संपली. त्यानंतर प्रशासक म्हणून सीईओ दिलीप स्वामी यांची शासनाने नियुक्ती केली आहे.
जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू झाल्यावर पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषदेचे विषय सभापतींच्या गाड्या जमा करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांची ही आलिशान सफारी गाडी दक्षिण सोलापूरच्या गॅरेजमध्ये धुळखात पडून आहे. जिल्हा परिषदेकडे इतक्या गाड्या शिल्लक असताना प्रशासक मात्र भाड्याची इनोवा कार वापरत असल्याचे निदर्शनाला आले आहे.
प्रशासकाने काटकसर करून पैसे वाचवावेत व हे पैसे गरिबांच्या कल्याणासाठी द्यावेत, अशा मागणीचे निवेदन लोकशासन आंदोलन पार्टीने यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिले होते. पण मागणीची दखल न घेतल्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी चक्क लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे, मारुती जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी चक्क जिल्हा परिषदेत भीक मागून आंदोलन केले. सीईओ यांच्या गाडीचे भाडे द्यायचे आहे, त्यासाठी पैसे द्या, असे म्हणत या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत येणाऱ्या जाणाऱ्यांकडून भीक मागितली व हे पैसे देण्यासाठी ते सीईओ स्वामी यांच्या दालनात गेले असता ते व्हिसीमध्ये ‘बिझी’ असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे हे पैसे द्यावेत असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याकडे निवेदन व पैसे देऊ केले. मात्र, त्यांनी ती रक्कम स्वीकारली नाही. ही रक्कम मनीऑर्डरने सीईओंना पाठविण्यात येणार असल्याचे दिंडोरे यांनी सांगितले. सीईओ यांच्या भाड्याच्या गाडीसाठी कार्यकर्त्यांनी केलेले हे आंदोलन जिल्हा परिषदेत चर्चेचे ठरले आहे.