यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंते संतोष कुलकर्णी, प्रसाद काटकर, नरेंद्र खराडे तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, अधीक्षक तांबोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेच्या व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केल्याची दखलही यावेळी घेण्यात आली. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभागामार्फत वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या भरघोस निधीबद्दल अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, पक्ष नेत्या रश्मी बागल, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, व्यंकटेश भालके, अतुल पवार आणि अजिनाथ देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले. आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने काम करत असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पालखी मार्गावरील सांगोला, माढा, बार्शी, मंगळवेढा तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देण्याची मागणी सदस्यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पूर्वी ८१ ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या ३ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानात एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आणखी १० ग्रामपंचायतींचा पालखी मार्गातील गावांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Vitthal Katha: पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन, कसे पडले नाव? जाणून घ्या कथा
ग्रामपंचायत विभागामार्फत वारकरी स्वागत कमानी, पायांना आराम देणारे फुट मसाजर, मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हँगर), शौचालये, स्नानगृहे, पालखी तळांना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषध खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन आणि स्वच्छता व्यवस्थेसह विविध सुविधांच्या कामांना सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.
वारीपूर्व तयारीसाठी निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करून विकासकामांना गती दिल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या कार्याचे सदस्यांनी विशेष कौतुक केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनीही सर्व कामांच्या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवल्याचे नमूद करण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची निविदा प्रक्रिया सर्वप्रथम पूर्ण केल्याबद्दल कुशल जैन यांनी कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.
विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी सभागृहात मांडला. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून राऊत यांचे अभिनंदन केले.






