देवेंद्र फडणवीस (फोटो- टीम नवराष्ट्र )
सोलापूर: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. आपल्या भाषणात त्यांनी डायलॉग म्हणत सभेत एकच ऊर्जा निर्माण केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. यावेळी त्यांनी केलेले भाषण चांगले चर्चेत आले आहे.
आपल्या भाषणात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी यापूर्वी काही मुलाखतीमध्ये दोन पक्ष फोडून आलो असे बोललो आहे. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलो होतो तेव्हा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही मला १ आमदार द्या. १०६ आमदार झाल्यानंतर मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. तुम्ही समाधान आवताडे यांना आमदार केले आणि मी सरकार आणले.”
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपले, महायुतीचे सरकार राज्यात आले. ” यावेळेस बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अभिनेता अक्षय कुमार याच्या रावडी राठोड चित्रपटातील एक डायलॉग हाणला आहे. ते म्हणाले, “देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नही बोलता डेफीनेटली करता है. ” हा डायलॉग म्हणताच उपस्थित लोकांनी टाळ्या आणि शिट्टी वाजवून फडणवीस यांना दाद दिली.
🕟 संध्या. ४.२० वा. | ७-१०-२०२४📍मंगळवेढा, सोलापूर.
LIVE | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन#Maharashtra #Solapur #Development https://t.co/6CewAV9n2I
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 7, 2024
“राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आपण अनेक विकासकामे सुरू केली. ती पूर्ण देखील केली. आपले महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर दुष्काळी २४ गावांसाठी पाणी आणले. दुष्काळ संपविला. सांगोला उपसा सिंचन योजनेतून सांगोळ्याच्या ५० हजार हेक्टर जमिनीला लाभ झाला आहे. आता मंगळवेढा येथील १७ हजार हेक्टर जमिनीला लाभ होतो आहे. अनेकजण मला तुम्ही कुठून पाणी आणले असा प्रश्न विचारतात? मनात जिद्द असेल तर पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवून ते उपलब्ध करता येते, ” असे मंगळवेढा येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.