File Photo : ST Accident
धाराशिव : परांडा तालुक्यातील सोनारीजवळ एक भीषण अपघात झाला. एसटी बसचा मोठा अपघात झाला असून, या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, इतर पाचजण किरकोळ जखमी झाले. या बसमध्ये 18 प्रवाशी बसले होते.
हेदेखील वाचा : Video: आयटी हब असलेल्या पुण्यात नोकऱ्यांची मारामार; जॉबसाठी हजारो तरूण रांगेत, बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर
प्रवासी व विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत. ही घटना परंडा तालुक्यातील सोनारी मधील हरणवड्याजवळ घडली. रोहकलहून परंड्याला जात असताना एसटी बसचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सोनारी व कंडारी येथील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील तात्या वीरभद्रा पाटणे (वय 59) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
चालकासह वाहकालाही गंभीर दुखापत
एसटी बसचा स्टेअरिंगरॉड तुटल्याने ही बस थेट एका झाडावर आदळली. धक्कादायक म्हणजे अपघात इतका भीषण होता की, बसचालक विठ्ठल दनु तौर यांचे बसच्या पत्र्यात पाय अडकल्याने त्यांना जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने नागरिकांनी ओढून बाहेर काढले. वाहक योगेश दत्तात्रय अनपुरे यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.
ग्रामस्थ धावले मदतीला
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एमएच २० बीएल २१०५) एसटी बस रोहकलहून परंड्याला जात होती. त्यादरम्यान हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सोनारी व कंडारी ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. प्रवासी व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासात तात्या विरभद्र पाटणे या वृध्दाला मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ. अबरार पठाण यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले.
पुण्यात एसटीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना रास्ता पेठेत घडली आहे. याप्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यंकट रामण (वय ७४, रा. वैष्णवी अपार्टमेंट, रास्ता पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यंकट रामण यांचे भाऊ अरुणकुमार (वय ६९) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेदेखील वाचा : Pune: तीन वर्षांमध्ये 14 हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; कशी आहे प्रक्रिया?