एसटीला राज्य सरकारचा शॉक, इलेक्ट्रिक बसच्या तोट्याची रक्कम देण्यास नकार घंटा, श्रीरंग बरगे यांचा आरोप
दरम्यान, एसटी महामंडळाच्या ताफ्यात आज पर्यंत ६४१ इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून बसेस येण्याच्या संख्येत अपेक्षित वाढ होत नसली तरी संथ गतीने का होईना,वाढ होत आहे . जस जशा बसेस दाखल होतील, त्या प्रमाणात तोटा सुद्धा वाढत चालला असून तोट्याचा व्यवहार्यता पूरक निधी देण्यात क्लिष्ट निर्माण झाला आहे . तांत्रिक कारण देत सरकारने निधी देण्यास नकार घंटा वाजवली असून एसटीला हा शॉक दिला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
विजेवरील जास्तीत जास्त बस रस्त्यावर येऊन प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून इलेक्ट्रिक बसेस खरेदीवर सबसिडी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे यातून होणारा तोटा सुद्धा भरून देण्याचे सरकारचे धोरण असून याच धोरणाखाली एसटीने येणाऱ्या तोट्याची म्हणजेच व्यवहार्यता पूरक निधीची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच होणाऱ्या तोट्याचा निधी अंदाजे तीन हजार कोटी रुपये सरकारने एसटीला अद्यापि दिला नसून आता त्यात नवीन क्लिष्ट निर्माण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
तोट्याची रक्कम एसटीला देण्यात यावी असा ठराव राज्य परिवहन मंडळाच्या संचालक मंडळाच्या जुलै २३ मध्ये झालेल्या बैठकीत पारित करण्यात आला असून सदरची रक्कम सरकारने एसटीला देण्यात यावी अशी विनंती ठरावद्वारे करण्यात आली होती.मात्र सदर ठरावाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली नसून मंजुरी दिल्या शिवाय हा निधी देता येणार नाही असा तांत्रिक मुद्दा शासनाने उपस्थित केला असून त्यांमुळे हा निधी आता बुडेल का? अशी शंका निर्माण झाली आहे. तकलादू कारण देत सरकार आपल्याच धोरणाला हरताळ फासण्याचे काम करीत असून हे संयुक्तिक नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.






