रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटीच गेली रस्त्याच्या कडेला; चालकाने वेळीच सतर्कता दाखवली अन् दुर्घटना टळली
वरवंड : पुणे-सोलापूर हायवेच्या दुभाजकाला ओलांडून जाणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात गेली. ही घटना वरवंड येथील इंडियन पेट्रोल पंपासमोर घडली. एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दौंड एसटी डेपोचे वाहन परिक्षक अनिल भागवत यांनी घटनास्थळी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरून (एमएच २० बीएल २०३४) औसा-वल्लभनगर ही बस पुणे बाजूकडे जात होती. ही बस वरवंडजवळ असलेल्या इंडियन पेट्रोल पंपाजवळ आली असताना, एक रिक्षा दुभाजकातून थेट एसटी बसला आडवी आली. या रिक्षाला वाचवण्यासाठी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रिक्षाचा मोठा अपघात टळला. मात्र, निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे बस थेट खड्ड्यात गेली. यावेळी बसमध्ये 24 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने बसमधील कोणतीही जीवितहानी झाली नाही.
काही दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाचा बेबी कॅनॉलचे पाणी वाहून नेण्यासाठी, पाईप टाकण्यासाठी या ठिकाणी दुभाजकासह दोन्ही बाजूंनी रस्ता उकरला होता. मात्र, काम होऊन काही दिवस झाले. उकरलेला दुभाजक दुरुस्त न बांधल्यामुळे येथूनच छोटी मोठी वाहने पेट्रोल सीएनजी गॅस, भरण्यासाठी खुलेआमपणे रस्ता ओलांडत आहेत. यामुळे येथे होत असलेल्या अपघाताला रस्ते कंपनी जबाबदार राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एसटीच्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
या अपघाताची माहिती अपघातग्रस्त बसचे चालक व वाहक यांनी दौंड डेपोला दिल्यानंतर दौंड डेपोचे कर्मचारी परीक्षक अनिल भागवत, यांत्रिक पाळी प्रमुख विलास टिक्के व सहाय्यक सुनिल फरगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना इतर बसने बसवून देण्यात आले.
बेस्ट बसची ट्रकला जोरदार धडक
दुसऱ्या एका घटनेत, मुंबईत बेस्ट बसचा ट्रकला धडकून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील पाच ते सहा प्रवासी या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही बस बोरिवलीहून अंधेरीच्या दिशेने जात होती. गोरेगाव परिसरातील वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जाताना बेस्ट बसचा ताबा सुटला. यावेळी प्रचंड वेगात होती. नियंत्रण सुटल्यामुळे बेस्टने बसने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली.






