शिक्रापूर : रांजणगाव सांडस (ता.शिरुर) येथील राक्षेवाडी फाटा येथे रात्रीच्या सुमारास एका कारसह कारचालक (Car Driver) जळून खाक झाल्याची घटना घडली. शिरुर पोलीस स्टेशन (Shirur Police Station) येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती शिरुर पोलिसांनी दिली.
संभाजी राक्षे हे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील या स्विफ्ट कारमधून चाललेले होते. घरापासून एक किलोमीटर अंतरावर राक्षे यांची कार आलेली असताना कार रस्त्यालगत जळालेल्या अवस्थेत दिसून आली. कार जळत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने कारची आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कारमध्ये चालकाचा आगीमध्ये होरपळून खाक होऊन मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर शिरुर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
त्यावेळी कारला लागलेल्या आगीमध्ये संभाजी शहाजी राक्षे (वय 48 वर्षे रा. रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर कारचा अपघात होऊन कारला आग लागली असावी अथवा कारमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. संभाजी राक्षे यांना कारमधून बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.