कल्याण लोकसभा मतदार संघात खासदार संजय राऊत यांची एंट्री झाली. एंट्री करताच त्यांनी महायुतीला मोठा धक्का दिला. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात मंदिराचे जिर्णोद्धार कार्यक्रम होता. त्यानिमित्त संजय राऊत आले होते. संजय राऊत यांची गावात स्वागताची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकत कल्याण लोकसभा मतदार संघातून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या उपस्थित होत्या. या मिरवणूकीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड दिसल्याने राजकीय भूकंप झाला आहे.
आज गोरपे गावात एका मंदिराच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमास ठाकरे गटाचे नेते खासदार राऊत येणार होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी नेवाळी नाक्यावर करण्यात आली होती. त्यांची गाडी नेवाळी नाक्यावर एंट्री झाली. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांचे स्वागत केले. यानंतर संजय राऊत गोरपे गावात दाखल झाले. या वेळी त्यांच्या जीपवर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या होत्या. मात्र त्याच जीपमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील होत्या. त्यामुळे ठाकरे गटाने शिंदे सेनेच्या महायुतीला जोर का झटका दिला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलिस ठाण्यात जागेच्या वादातून कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. या गोळीबार प्रकरणात आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे ते सध्या तळोजा कारागृहात आहे. दरम्यान भाजप आमदार गायकवाड यांचे समर्थक असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार शिंदे यांचे काम करणार नाही. कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवारी द्यावी असा ठराव केला. त्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना करावा लागला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी भाजप पदाधिकारी वर्गाची बैठक घेऊन कल्याण पूर्वेतील वाद संपला असल्याचे म्हटले हाेते. वाद संपुष्टात आला असल्याचे सांगितले जात असले तरी नववर्ष स्वागत यात्रेत गुढी पा्डव्याला भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांची गळाभेट घेऊन त्यांना नववर्षाच्या सुभेच्छा दिल्या होत्या. शुभेच्छा कोणी कोणाला देऊ शकतो अशी सारवासारव आमदार गायकवाड गटाकडून केली गेली. आज पुन्हा गोरपे गावात भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या संजय राऊत यांच्या स्वागत मिरवणूकीत सहभागी झाल्याने या कल्याण पूर्वेतीली शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद संपुष्टात आलेला नाही हेच अधोरेखीत झाले.